मुंबई : डॉक्टरांना होणारी मारहाण, मुलांची अदलाबदल किंवा चोऱ्या इत्यादी घटना लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने मुंबईतील पालिका हॉस्पिटलमधील प्रसूतीगृहांमधील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या 14 रुग्णालयात 185 सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रसूतीगृहांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची वाढती संख्या विचारात घेता, मुंबई महापालिकेच्या अख्यारित प्रसूतीगृहांमध्ये लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी मागणी हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने 14 प्रसूतीगृहांमध्ये एकूण 185 कॅमेऱ्यांची सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. कॅमेरे खरेदीसाठी दोन कोटी 58 लाख 96 हजार 420 रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 135 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
78 डोम कॅमेरे, 46 बुलेट कॅमेरे आणि 11 पी.टी. झेड कॅमेरे असणार आहेत. यासाठी एक कोटी 82 लाख 62 हजार 558 रुपये खर्च केले जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला आहे.
दुरुस्ती न केल्यास दंड
प्रसूतीगृहातील कॅमेरे बंद किंवा नादुरुस्त झाल्याच्या तक्रारी आल्यास त्यांचे निवारण 8 तासांत करणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. मुदतीच्या वेळेत दुरुस्ती न केल्यास संबंधिताला प्रथमतः 500 रुपये दंड आकारला जाईल. मात्र, त्यानंतरही कंत्राटदारांने दुर्लक्ष केल्यास त्याला दोन हजार रुपये दंड आकरण्यात येणार आहे.
कुठल्या प्रसूतीगृहात किती कॅमेरा लावण्यात येणार आहेत?