विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 2 मार्च 2023 : एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. धर्मांतर केल्यानंतरही आदिवासींच्या सवलती लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 257 जणांनी हा लाभ उठवल्याची बाब समोर आली आहे. या सर्व प्रकरणाची मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही चौकशी करून योग्य ती कारवाई करणार आहोत. आदिवासींना त्यांचे हक्क मिळालेच पाहिजे. त्यांचे हक्क कुणीही हिरावून घेता कामा नये, असंही मंगलप्रभात लोढा म्हणाले.
मंगल प्रभात लोढा यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. आदिवासींच्या सवलती लाटल्या जात असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी आदिवासी संदर्भातील एक समिती स्थापन करण्यात आली होती. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या समितीच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. त्यात 257 जणांनी धर्मांतरानंतरही सवलती घेतल्याचं दिसून आलं होतं. आदिवासी समाजाची नावे लावून त्यांनी या सवलती घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. यात ख्रिश्चन, बौद्ध आणि मुस्लिमांचा तसेच हिंदू धर्मातील इतर जातींच्या लोकांचा समावेश आहे. या सर्वांनी आदिवासी असल्याची नोंद करून लाभ घेतले होते. या प्रकरणी कारवाई करण्याची विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करण्यात आल्याचं मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं.
बुध्दिस्ट – 04
मुस्लिम – 37
ख्रिश्चन – 03
माहीत नसलेले – 22
इतर – 190
शीख – 01
एकूण – 257
257 जणांनी धर्मांतर केलं होतं. त्यानंतरही हे विद्यार्थी आयटीआय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी म्हणून आदिवासी सवलतींचा लाभ घेत होते. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेशही दिले आहे. या प्रकरणामागे आणखी कोणी आहे का? यात आणखी कोणी सहभागी आहेत काय? अजून कुणाकुणाला लाभ मिळत आहे? याची आम्ही चौकशी करणार आहोत, अशी माहितीही लोढा यांनी दिली आहे. या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.