मुंबई- दादरमध्ये एकनाथ शिंदे गट (CM Eknath Shinde)आणि शिवसेना (Shivsena)यांच्यात शनिवारी रात्री झालेल्या राड्यात पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी सकाळी शिवसेनेच्या नेत्यांनी दादर पोलीस स्टेशसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यात अनिल परब, अरविंद सावंत, किशोरी पेडणेकर हे नेते उपस्थित होते. त्यानंतर या पाच शिवसैनिकांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामीन मिळालेल्या पाच शिवसैनिकांना सोबत घेऊन विभागप्रमुख महेश सावंत हे मातोश्रीवर गेले (Matoshree)आणि त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या पाच शिवसैनिकांचं कौतुक केलं आहे.
या भेटीनंतर विभागप्रमुख महेश सांवत यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संयम बाळगा असा सल्ला दिला आहे. आपल्याला कुणाशी मारामारी करायची नाही, पक्ष वाढवायचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हे आमचे गुरु आहेत, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे सावंत यांनी यावेळ सांगितले. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य केले असेही सावंत यावेळी म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या शिवसैनिकांचे कौतुक केले आहे. महेश सावंत आणि इतर 5 शिवसैनिकांचं आदित्य ठाकरे यांनीही कौतुक केले आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसवण्यात आले. तर आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये बसले होते.