रमेश शर्मा, गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : गोरेगावच्या उन्नत नगरमधील एसआरएच्या जय भवानी इमारतीला काल मध्यरात्री भीषण आग लागली. इमारतीतील लोक गाढ झोपेत असताना लागलेल्या या भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत 31 जण जखमी झाले असून त्यातील 14 जण गंभीर जखमी आहेत. या आगीमुळे सोसायटीतील 40-50 रहिवाशी गुदमरले असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्री लागलेली ही आग नियंत्रणात आली आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान कुलिंग ऑपरेशन करत आहेत. या आगीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
गोरेगाव पश्चिमेच्या उन्नतनगरमधील जय भवानी इमारतीच्या पार्किंगमधील चिंध्यांना काल मध्यरात्री 3 वाजता भीषण आग लागली. या आगीत सोसायटीतील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग लागली तेव्हा सोसायटीतील सर्व लोक गाढ झोपेत होते. त्यावेळी आग लागल्याने या लोकांचा होरपळून मृत्यू झाला.
मृतांमध्ये 3 मुले, 3 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर 31 जण जखमी झाले आहेत. त्यातील 14 जण गंभीर जखमी आहेत. या आगीत पार्किंगमधील 30 दुचाकी आणि 4 कार जळून खाक झाल्या आहेत. या आगीमुळे पसरलेल्या धुरामुळे 40 ते 50 जणांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे या सर्व रहिवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ही तळमजला अधिक पाच मजली इमार आहेत. ही आग पार्किंगमधील साठलेल्या चिंध्यांना आग लागली. त्यानंतर ही आग तळमज्यावरील दुकानाला लागली आणि आगीचा अचानक भडका उडाला. नंतर ही आग हळूहळू इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरली. त्यामुळे इमारतीतील रहिवाश्यांच्या तोंडचं पाणीच पळाले. सर्वजण आगीपासून वाचण्यासाठी सैरावैरा धावत होते. वाचवा वाचवाचा आक्रोश सुरू होता. दिसेल त्या मार्गाने लोक पळत होते. इमारतीत अंधार पसरला होता. मात्र, तरीही लोक जिवाच्या आकांताने पळत होते.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. आग नियंत्रणात आणतानाच लोकांची सुखरुप सुटका केली. अग्निशमन दलाने सोसायटीतील 40 ते 50 लोकांची सुटका केली. सध्या या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनीही घटना स्थळी धाव घेतली.
बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात 25 जखमींना दाखल करण्यात आलं आहे. त्यात 12 पुरुष, 13 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
कुपर रुग्णालयात 15 जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यात 6 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे.
या दुर्गटनेत आतापर्यंत 40 जण जखमी झाले असून 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
एसआरए इमारतीत पार्किंगच्या मागे चिंध्यांचे स्टोअरेज होते. त्यात आग लागली. कपड्याचा धूर जाडसर असतो. तो काळाकुट्टही असतो. हा धूर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत गेला. त्यामुळे अनेकांना गुदमरल्यासारखे झाले. त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं अग्निशमन दलाच्या जवानाने सांगितलं.