कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्या, रेल्वेचं आवाहन; तीन दिवसाचा सर्वात मोठा मेगा ब्लॉक

| Updated on: May 29, 2024 | 7:12 PM

मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. या तीन दिवसात अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करणं कठिण होणार आहे. त्यामुळेच रेल्वेने आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. तसेच या काळात कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचं आवाहनही रेल्वेने कंपन्यांना केलं आहे.

कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्या, रेल्वेचं आवाहन; तीन दिवसाचा सर्वात मोठा मेगा ब्लॉक
mega block
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सेंट्रल रेल्वेने तीन दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे स्थानका दरम्यान मध्य रेल्वेने 63 तासांचा म्हणजे तीन दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. गुरुवारी रात्रीपासूनच हा मेगा ब्लॉक सुरु होणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम लोकल सेवेवर होणार आहे. परिणामी चाकरमान्यांची मोठे हाल होणार आहे. त्यामुळेच विनाकारण घराच्या बाहेर पडू नका. काम असेल तरच लोकलने प्रवास करा, असं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यानच्या स्थानकांच्या प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण आणि विस्तारीकरण करण्यात येणार आहे. बुधवारपासूनच हे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने गुरुवारी मध्यरात्रीपासूनच तीन दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे मुंबईतील लोकल सेवेवर या मेगा ब्लॉकचा परिणाम होणार आहे. तसेच एक्सप्रेस गाड्यांनाही या मेगा ब्लॉकचा फटका बसणार आहे. मुंबईच्या लोकलमधून रोज 70 लाख प्रवासी प्रवास करत असतात. मेगा ब्लॉकमुळे या प्रवाशांचे हाल होऊ शकतात. त्यामुळे गरज नसेल तर प्रवास करू नका, असं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे.

रुंदीकरण, विस्तारीकरण

मध्य रेल्वेच्या मुंबई परिमंडळाचे डिव्हिजनल मॅनेजर रजनीश गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन या मेगा ब्लॉकची माहिती दिली. रेल्वे स्थानकांच्या रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 चं रुंदीकरण आणि विस्तारीकरण होत आहे. त्यामुळे 63 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. गुरुवारी रात्री 12.30 वाजल्यापासून हा मेगा ब्लॉक सुरू होईल. तेसच प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 च्या विस्तारीकरणाशी संबंधित कामासाठी 36 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा मेगा ब्लॉक शुक्रवारी मध्य रात्री 12.30 वाजता सुरु होणार आहे, अशी माहिती रजनीश गोयल यांनी दिली.

अनेक एक्सप्रेस रद्द

मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे मध्य, हार्बर कॉरिडोअरवर एकूण 72 मेल एक्सप्रेस ट्रेन आणि 956 लोकल ट्रेन शुक्रवार ते रविवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला यांनी दिली आहे. ब्लॉकच्या काळात अनेक मेल एक्सप्रेस आणि उपनगरीय लोकल वडाळा,दादर, ठाणे, पुणे, पनवेल आणि नाशिक स्थानकात शॉर्ट टर्मिनेट आणि शॉर्ट ओरिजिनेट केली जाणार आहेत.

वर्क फ्रॉम होम द्या

तुमच्या कार्यालयातील कर्मचारी वर्ग मर्यादित ठेवावा, अशी विनंती आम्ही सर्व अस्थापनांना (कंपन्या) करत आहोत. तुमच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची किंवा अन्य प्रकारे काम करण्याची सुविधा द्यावी अशी विनंती आम्ही करत आहोत. त्यामुळे प्रवाशांना सोयीचं होईल, असं आवाहन नीला यांनी केलं आहे. तसेच बेस्ट आणि एसटी महामंडळाला या तीन दिवसात अतिरिक्त बसेस चालवण्याचं आवाहनही केलं आहे.