मुंबई : भरधाव हावडा एक्सप्रेसची धडक बसल्याने मध्य रेल्वेचे 28 वर्षीय ट्रॅक मेन्टेनर भूषण शांताराम मोडक यांचा शनिवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोपर स्थानकाजवळ सहा नंबर जलद मार्गावर ते ड्यूटी बजावत असताना सकाळी पावणे बाराच्या सुमारास हा अपघात झाला. मोडक यांच्या मृत्यूने मध्य रेल्वेच्या त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. यापर्वीही ट्रॅकची देखभाल आणि इतर कामे करताना रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने कामाच्या ठीकाणी सुरक्षित वातावरण करण्याची मागणी होत आहे.
मध्य रेल्वेमध्ये साल 2015 पासून भूषण शांताराम मोडक काम करीत होते. मध्य रेल्वेचे ट्रॅक मेन्टेनन्स टीममधील ते महत्वाचे सदस्य होते. त्यांच्या जाण्यामुळे मध्य रेल्वेच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ट्रॅकच्या देखभालीचे काम करीत असताना त्यांचा अंदाज चुकल्याने त्यांना भरधाव हावडा – मुंबई एक्सप्रेसची धडक बसली त्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहीती सूत्रांनी दिली.
मध्य रेल्वेची मोठी हानी
मोडक यांच्या अपघाती मृत्यूची बातमी सकाळी पसरली तशी मध्य रेल्वे परिवार आणि मोडक यांच्या सहकाऱ्यांना तीव्र धक्का बसला आहे. मोडक हे त्यांच्या कामातील कौशल्यामुळे ओळखले जात होते. त्यांचा मृत्यू इतक्या कमी वयात झाल्याने मध्य रेल्वे परिवाराला धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
चौकशीची मागणी
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक कर्मचाऱ्यांचे ड्यूटी बजावताना यापूर्वी मृत्यू झालेले आहेत. रेल्वे मार्गावर पिकअवरला दर दोन ते तीन मिनिटांना लोकल आणि लांबपल्ल्यांच्या गाड्या धावत असताना सेफ्टी प्रोटोकॉलचे उल्लंघन होत असल्याचा आरोप कर्मचारी करीत आहेत. या प्रकरणात नेमका कशामुळे हा अपघात नेमका कशामुळे झाला याच्या चौकशीची मागणी होत आहे.