अमजद खान, टीव्ही 9 मराठी, ठाणे: गेल्या 3 महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला कल्याणमधील जुना पत्रीपूल पाडण्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. हा पूल पाडण्यासाठी येत्या रविवारी 18 नोव्हेंबरला मध्य रेल्वेवर सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लोकल, मेल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक ठरलेला पत्रीपूल गेल्या 3 महिन्यांपासून ‘जैसे थे’ अवस्थेत होता. हा पूल पाडून याठिकाणी नवा पूल उभारण्यात येणार आहे. पण 3 महिने उलटूनही या पुलाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु होते. मात्र काही दिवसांपूर्वी मनसेने केलेल्या आंदोलनानंतर या पुलाच्या कामाला गती आलेली दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी मध्य रेल्वेने सहा तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केला आहे.
रविवारी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 पर्यंत हा विशेष ब्लॉक घेतला जाणार असून त्या कालावधीत या पुलाचा लोखंडी सांगाडा (स्ट्रक्चर) काढण्याचे प्रस्तावित आहे.
पण या सहा तासांच्या विशेष ब्लॉकचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर होणार असून, 170 लोकल,15 एक्स्प्रेस मेल वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. तर या कालावधीत सीएसएमटी ते डोंबिवली आणि कर्जत-कसारा ते कल्याण या मार्गावर लोकलसेवा सुरु राहणार आहे. त्यामुळे यापुढील प्रवासासाठी लोकांना पर्यायी रस्ते वाहतुकीचा अवलंब करावा लागणार आहे.