मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, असा धक्कदायक दावा ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. “आयकर विभागाची धाड पडली होती. सोबत येता की आत टाकू? असं शिंदेंना सांगण्यात आलं होतं. यानंतर शिंदे दाडी खाजवत रडत होते. भाजपसोबत चला, नाहीतर आम्हाला आत टाकतील, असं एकनाथ शिंंदे म्हणाले होते”, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
“एकनाथ शिंदे यांना ऑफर दिली होती. कॅश ऑर जेल? त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं. इनकम टॅक्सची धाड पडली होती. त्यांना सांगितलं की, येताय की टाकू आतमध्ये? मग ते लगेच दाढी खाजवत रडायला लागले. एकनाथ शिंदेंनी 20 मे ला वर्षा बंगल्यावर येऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की, मला हे धमकावत आहेत. जेलमध्ये जाण्याचं हे माझं वय नाहीय. मी काय करु साहेब? मला हे आत टाकतील. तुम्ही काहीतरी करा. भाजपसोबत चला. हे आम्हाला आत टाकतील. हे सगळं रडगाणं झालं होतं”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. “ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, अहोरात्र ताकद दिली त्या व्यक्तीबद्दल जरी वैर आलं तरी वैयक्तिक पातळीवर टीका करताना, तो किती वयाचा आहे, याचं भान ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तो भान ठेवला जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही ते गांभीर्याने घेऊ नका”, असं उदय सामंत म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाच्या जळगाव लोकसभा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रावेर लोकसभा या दोन्ही मतदारसंघांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले जाणार आहेत. शिवतीर्थ मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज भरण्यासाठी रोड शो होणार आहे. “अर्ज दाखल करण्यासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी माझ्या पाठिशी उभे भक्कमपणे ज्यांची साथ आहे, असे आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत तसेच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नेते येणार आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते करण पवार यांनी दिला आहे. माझे मित्र आणि विरोधक मंगेश चव्हाण यांनी म्हटलं होतं की आमचा पिक्चर संपलेला आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने जी गर्दी असेल तो आमच्या पिक्चरचा ट्रेलर असेल आणि त्यावरून पिक्चरचा शेवट कसा असेल हे ठरवावं”, असा टोला करण पवार यांनी लगावला.