मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या महाराष्ट्राचा महासंकल्प या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी 2019च्या पहाटेच्या शपथविधीवर मोठे गौप्यस्फोट केले. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं काही तासांचं सरकार स्थापन झालं होतं. हे सरकार स्थापन होण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सहमती होती. याशिवाय आपली शरद पवार यांच्यासोबतच याविषयी चर्चा झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच सरकार स्थापनेसाठीचा प्रस्ताव आला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांच्या या गौप्यस्फोटावर माजी पर्यटन मंत्री आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पाठराखण केली.
“मी एवढंच बघितलं, ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्या मिनिटापासून शरद पवार, अजित पवार, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल ते उद्धव ठाकरे यांच्यामागे भक्कमपणे उभे आहेत. ते आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्रामागे उभे आहेत”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
“ज्यांना आम्ही आपलं मानलं, ज्यांना आम्ही सगळं दिलं, त्यांच्यासाठी दिवस-रात्र मेहनत केली, त्यांच्यासाठी सगळे वार अंगावर घेतले त्याच लोकांनी जेव्हा आम्ही त्यांना मिठी मारली तेव्हा त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. पण जे आमचे नवे मित्रपक्ष झाले ते अजूनही आमच्यासोबत आहेत. आता समजायचं काय? हे तुम्ही विश्लेषण करा”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“हे दु:ख वेगळं असतं. ज्यांना आम्ही कधीतरी काका म्हणायचो, आम्ही दिवसरात्र प्रचार करायचो, त्यांच्यासाठी सगळं काही केलं. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर केवढा विश्वास ठेवला”, असं आदित्य म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांचं कुटुंब असल्याने त्यावेळी आम्हीच खचलो तर महाराष्ट्र कसा पुढे जाईल? असा विषय होता. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला. पण या लोकांकडून गद्दारी होते, पाठिंत खंजीर खुपसला जातो ते वार खूप खोल असतात. पण आता त्यावर लक्ष न देता आम्ही पुढे चाललो आहोत”, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली.
“महाविकास आघाडी एक वेगळं रसायन झालेलं आहे. देशात लोकशाही टिकवायची असेल तर समाजातील सगळ्या घटकांना सोबत घेऊन काम करणं गरजेचं असतं. आम्ही गलिच्छ राजकारण केलं नाही”, असं आदित्य यावेळी म्हणाले.
माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. आमच्यासोबत निवडून आले. निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे एकप्रकारे विश्वासघात त्यांनी केला.
दुसरा विश्वासघात आमच्यासोबत केला त्यांना मी कमी दोष देईन. कारण त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. ज्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करत आहेत. त्यांची चर्चा पुढे गेलीय हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवंय. म्हणून आपण सरकार तयार करुया.
राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही. त्यामुळे आम्ही निश्चय केला की चला ठिक आहे. म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती.
शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला. पहिला विश्वासघात जास्त मोठा होता. कारण आपल्याच व्यक्तीने केला होता. तर दुसरा छोटा होता.
तुम्ही पहाटेच्या शपथविधीवर सकाळ, पहाटे किंवा अर्ध्या रात्रीचं म्हणा. काय फरक पडतो? भूतकाळ हा भूतकाळ आहे. पण त्यानंतर या दोघांनी आमच्यासोबत जी वागणूक केली होती, त्यामुळे आम्हाला संधी मिळाली, त्यांच्या पक्षात कुरबुरी झाल्या. त्यांचे लोकं बाहेर पडले. त्यांना माहिती हे मान्य नव्हतं की कशाप्रकारे हे सरकार चालतंय.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर हे सरकार चालत नाही. आम्हाला गुदमरतंय, असं त्यांना वाटत होतं. त्याचा आम्ही मौका घेतला. आम्ही त्यांना सोबत घेतलं. आम्ही त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं. मी तर असं म्हणतो एकदम नैसर्गिक सरकार आहे. कारण या सरकारमधील जे लोक आहेत त्यांनी एकमेकांसाठी मतं मागितली होती. त्यामुळे मी बदला हा शब्द वापरला होता. तुम्ही मला जे दिलं ते व्याजासहीत परत केलं.
पहाटेच्या शपथविधीच्यावेळी अजित पवार यांचं बंड होतं का? इथूनच सुरुवात होईल. मला असं वाटतं की, तुमच्याकडे अजित दादा येवून गेले आहेत. त्यांनी बऱ्याच प्रश्नांवर नो कमेंट्स केलंय. त्यामुळे काही करता का होईना त्यांनी माझ्यासोबत शपथविधी घेतली होती. त्यामुळे काही पथ्य मीसुद्धा पाळली पाहिजेत. त्यामुळे काही कमेंट त्यांना करुद्या. त्यानंतर उर्वरित कमेंट मी करतो.
अजित दादा आमच्याकडे आले होते किंवा त्यांनी माझ्याबद्दल शपथ घेतली होती ती फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती ही गोष्ट सांगावी लागेल. त्यामुळे त्यांच्याकडे ठरल्यानंतर काय स्ट्रॅटेजी बदलल्या, ते कसे तोंडघशी पडले हे ते सांगतील. त्यांनी नाही सांगितलं तर पुढच्या मुलाखतीत मी सांगेन, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.