मुंबई: शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती करून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. शिवसेनेच्या (shivsena) या निर्णयावर भाजपकडून (bjp) सातत्याने टीका होत आहे. ही अभद्र युती असल्याचंही भाजपकडून सांगण्यात आलं आहे. तसेच मोदींच्या जीवावर तुमचे आमदार निवडून आले. तुम्ही आमच्या पाठित खंजीर खुपसून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला. लग्न आमच्याशी लावलं आणि पळून दुसऱ्यासोबत गेलात, अशी हिनवणीही भाजपकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो की शिवसेना नेते संजय राऊत असोत सातत्याने उत्तर देत असतात. उद्धव ठाकरे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबरोबर झालेल्या बंददाराआडील चर्चेचा दाखला देऊन भाजपनेच खंजीर खुपसल्याचं वारंवार सांगत असतात. आता शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही भाजपवर पलटवार केला आहे. तसेच आजची शिवसेनेची युती किती चांगली आहे हे एका वाक्यात सांगून भाजपवर निशाणा साधला आहे.
बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, मुंबई विद्यापीठ, सार्थ प्रतिष्ठान व मुंबई न्यूज फोटोग्राफी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन फोर्टच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी या फोटो प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. बाळासाहेब आणि पवार साहेबांची मैत्री ही तेव्हापासून होती. वर्षानुवर्षे होती. मला असं वाटतं की आज महाविकास आघाडीचे सरकार झाले आहे, एक युती झालीय, मैत्री झालीय ती बघायला मोठे साहेब (बाळासाहेब) असायला हवे होते, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
बाळासाहेबांबरोबर मी राहिलो. मला राजकारणात रस होता. मी त्यांच्या बरोबर दौऱ्याला निघून जात असे. म्हणजे एक क्षण असा होता की एक निवडणूक जिंकलो होता. चौथ्या दिवशी माझी माझी परीक्षा होती. मी आईला न सांगताच वडिलांबरोबर दौऱ्याला निघून गेलो. आईचा फोन आला अरे तू कुठे गेला परवा तुझी परीक्षा आहे, अशी आठवण त्यांनी सांगितली.
राजकारणात ही सगळी मंडळी अग्रेसर होती, पुढे होती. मग महाजन असतील, मुंडे साहेब असतील. त्यावेळचे राजकारण खूप वेगळे होते. राजकीय स्टेजवरून टोकाची टीका,आरोप- प्रत्यारोप व्हायचे. पण पातळी सोडून कुणी खाली गेले नाही. मैत्री विसरले नाहीत. खोट्या केसेस, गुन्हे दाखल करणे कधीच झाले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेना प्रमुखांवरील दुर्मिळ फोटो पाहता पाहता आदित्य ठाकरे जुन्या आठवणीत रमले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या फोटोत आमची जुनी मातोश्री आहे. आमच्या आजीचे फोटो आहेत. माझा मतदान करायला जातानाचा फोटो आहे. मी कुटुंबासोबत मतदानाला गेलो होतो. त्यावेळी सहा ते सात वर्षाचा असेल. तेव्हा आपल्यालाही मतदान करायला कधी मिळेल याची उत्सुकता वाटायची. हा सर्व पिक्चर डोळ्यासमोरून गेला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
या ठिकाणी प्रत्येक फोटो आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो आहे. मोदींबद्दल आम्हाला आदरच आहे. ते जगजाहीर आहे. मुख्यमंत्र्यांनी हा आदर वेळोवेळी दाखवून दिला आहे. पण आमच्या दोन विचार धारा आहेत. हा राजकीय प्रवाह आहे, असं त्यांनी सांगितलं.
आम्ही सत्तेवर आल्यापासून आमच्यावर सातत्याने आरोप झाले आहेत. टीका झाली आहे. अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका झाली आहे. पण आम्ही त्यावर कधीच प्रतिक्रिया दिली नाही. खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची नाही. राजकारणात आरोपप्रत्यारोप सुरूच असतात, अशी शिकवण आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आम्ही कुणावर वैयक्तिक आणि खोटे आरोप केले नाहीत. उलट आम्ही टीका करत नसल्याने तुम्हालाही आश्चर्य वाटत असेल, असंही ते म्हणाले.