“मुंबईत ‘व्हीआयपी संस्कृती’ फोफावता कामा नये”, आदित्य ठाकरे यांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र

| Updated on: Jun 18, 2024 | 8:39 PM

"कोस्टल रोड रात्रीच्या वाहतुकीसाठी बंद असताना 16 जूनला रात्री 9 वाजता कोस्टल रोडवरून वाहतूक पोलिसांनी व्हीआयपी/मंत्र्यांच्या ताफ्याला परवानगी दिली", असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबईत व्हीआयपी संस्कृती फोफावता कामा नये, आदित्य ठाकरे यांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र
आदित्य ठाकरे यांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र
Follow us on

मुंबईच्या वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून कोस्टल रोड विषयी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “कोस्टल रोड रात्रीच्या वाहतुकीसाठी बंद असताना 16 जूनला रात्री 9 वाजता कोस्टल रोडवरून वाहतूक पोलिसांनी व्हीआयपी/मंत्र्यांच्या ताफ्याला परवानगी दिली”, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. “या VIP संस्कृतीला परवानगी का दिली जात आहे? जर व्हीआयपींना रात्रीच्या वेळी कोस्टल रोड वापरण्यास परवानगी असेल तर इतर नागरिकांना त्यावर परवानगी का नाही?”, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी पत्रात केला आहे. “येत्या आठवड्यापासून वरळी ते मरीन ड्राइव्ह हा कोस्टल रोड सर्व नागरिकांसाठी समानरितीने खुला करा”, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“मुंबईचा नागरिक आणि जिथून कोस्टल रोज सुरु होतो त्या वरळी विधानसभा क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आज तुम्हाला हे पत्र लिहित आहे. रविवार, १६ जून २०२४ रोजी घडलेल्या एका घटनेकडे मी आपले लक्ष वेधू इच्छित आहे. ह्या दिवशी ट्रॅफिक सिग्नलवर उभे असताना, वरळी सीफेस/बिंदूमाधव ठाकरे चौकातून कोस्टल रोडवर (दक्षिण दिशेला) व्हीआयपी/मंत्र्यांचा ताफा जाताना आम्ही नागरिकांनी पाहिला. व्हीआयपींसाठी तैनात असलेल्या वाहतूक पोलीसांनीच ह्या ताफ्याला कोस्टल रोडवर प्रवेश करण्याची सोय करुन दिली आणि ताफा जाताच हा रस्ता मुंबईकरांसाठी पुन्हा बंद करण्यात आला”, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

“कोस्टल रोड निर्मितीच्या स्वप्नापासून ते २०२२ जूनच्या अखेरीपर्यंत आम्ही हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी झटत होतो ते सामान्य लोकांसाठी हा मार्ग उपलब्ध व्हावा ह्यासाठी, केवळ व्हीआयपींच्या सोयीसाठी नव्हे! आमच्या वेळेस जो प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार होता, तोच प्रकल्प नंतरच्या राजवटीत रखडला आणि उ‌द्घाटनाला उशीर झाला हे पाहून वाईट वाटले होते”, असं आदित्य ठाकरे पत्रात म्हणाले.

‘हे पाहून धक्का बसला’

“सध्याही, महापालिका दर आठवड्याच्या शेवटी कोस्टल रोड बंद ठेवते आणि इतर दिवशी अंदाजे सकाळी ९ ते संध्याकाळी ५/७ वाजेपर्यंतच हा मार्ग नागरिकांसाठी खुला असतो, तेही महापालिकेच्या मर्जीनुसार. हे सगळे रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आहे हे आम्हालाही समजते. पण एका व्हीआयपी/मंत्र्यांना आणि त्यांच्या ताफ्याला रविवारी कोस्टल रोड बंद असतानाही त्यावरुन जाण्याची परवानगी मिळते, तेही मार्ग बंद होण्याची नेहमीची वेळ उलटून गेल्यावर, हे पाहून धक्का बसला. अशाने मुंबईत कधीच नसलेली ‘व्हीआयपी संस्कृती’ तर ह्यामुळे अवतरेलच, शिवाय व्हीआयपी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा जीवही धोक्यात येईल”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

‘प्रत्येक मुंबईकरच व्हीआयपी असायला हवा’

“महापालिकेने एकतर अशा व्हीआयपी ताफ्याला परवानगी का दिली ह्याचे स्पष्टीकरण द्यावे आणि ज्या अधिकाऱ्यांनी ह्या कृतीला परवानगी दिली असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. किंवा मग संपूर्ण मार्गच सामांन्यासाठी खुला करावा. मुंबईत ही ‘व्हीआयपी संस्कृती’ फोफावता कामा नये, मग तो कोणीही असो! उलट प्रत्येक मुंबईकरच ‘व्हीआयपी’ असायला हवा! येत्या आठवड्यापासून संपूर्ण कोस्टल रोडच सामान्य नागरिकांसाठी खुला करावा ही ह्या पत्राद्वारे मी तुम्हाला नम्र विनंती करतो”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.