बंदुकीची गोळी, अहवाल आणि घमासान, आदित्य ठाकरे यांनी सदा सरवणकर यांना पुन्हा डिवचलं

| Updated on: Jan 13, 2023 | 8:39 PM

"पुढे जात असताना आपण बघितलं तर गेल्या सहा महिन्यात, आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन करत असतो. पण स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके याच धोरणावर हे खोके सरकार पुढे चालले आहे", अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी केली.

बंदुकीची गोळी, अहवाल आणि घमासान, आदित्य ठाकरे यांनी सदा सरवणकर यांना पुन्हा डिवचलं
महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा हवा आहे; ठाकरे गटाची पहिल्यांदाच मोठी मागणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर (Shinde Group) पुन्हा निशाणा साधला. आदित्य यांनी आज शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माहिमचे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर निशाणा साधला. काही महिन्यांपूर्वी गणपती विसर्जनाच्यावेळी शिंदे आणि ठाकरे गटात मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी सदा सरवणकर यांनी बंदूक काढून हवेत गोळी झाडल्याची माहिती समोर आली होती. त्यावर पोलिसांचा तपास सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांचा महत्त्वाचा अहवाल आल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. या अहवालात सदा सरवणकर यांनी बंदुकीतून गोळी झाडल्याचं स्पष्ट झालंय. पण त्यांच्यावर तरीही कारवाई झालेली नाही, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

“राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून जणू काही मोगलाई आपल्या राज्यात आलेली आहे. ज्या मतदारसंघात आपण बसलेलो आहोत, तिकडचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी आमच्या पारंपरिक गणेशोत्सवात मिरवणुकीच्या वेळी बंदूक काढली, फायरिंग केली. त्याचा रिपोर्ट समोर आलाय”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतून गोळी आलेली होती, असं स्पष्ट झालंय. पण तरीही आर्म्स कायद्यान्वे कुठेही कारवाई झालेली नाहीय”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“असेच अनेक प्रसंग या महाराष्ट्रात गद्दार आमदारांकडून झालेले आहेत. कुणाला धक्काबुक्की असेल, कुणाला शिवीगाळ असेल, तर धमकी असेल, पण कुठेही कारवाई झालेली नाही”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

‘स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके’

“पुढे जात असताना आपण बघितलं तर गेल्या सहा महिन्यात, आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन करत असतो. पण स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके याच धोरणावर हे खोके सरकार पुढे चालले आहे”, अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी केली.

“सतत छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले यांचा अपमान करुनही राज्यपालांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हे खोके सरकार करत आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“हे सगळं होत असताना एक जाणवायला लागलं आहे, हा एक स्मोकस्क्रिन म्हणून खोके सरकार तयार करत आहे. त्याआडून पैसे काढणं, मुंबईला लुटणं, महाराष्ट्राला लुटणं हे खूप मोठ्या प्रमाणात सुरु आहे”, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.