मुंबई, दि. 9 फेब्रुवारी 2024 | दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या घटनेत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आता महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गंभीर आरोप केले आहेत. हा सर्व प्रकार ‘उबाठा’मधील गँगवार असल्याचे आरोप त्यांनी केला आहे. या दोन्ही व्यक्तींना मोठे करण्यामागे सामना आणि मातोश्री असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी उदय सामंत यांनी सामना वृत्तपत्रातील कात्रणे, ट्विट आणि बॅनर पुरावे म्हणून दिले.
अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणारा मॉरिसचे उदात्तीकरण ‘सामना’ वृत्तपत्रातून झाले. ‘सामना’मध्ये आलेल्या एका बातमीत म्हटले की, ‘कफ परेड ते शिर्डी ११५ दिवसांचा मदत यज्ञ’, अशा अनेक बातम्या मॉरिसच्या सामन्यातून आल्या आहेत. तसेच मॉरिस याने अनेक वेळा ट्विट करुन आपले नेते कोण आहेत, आपण कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे, हे सांगितले आहे. फेसबूक लाईव्हमध्ये त्यांनी आपणास उबाठा शिवसेना मोठी करायची आहे. महिलांसाठी एकत्र काम करायचे आहे. उबाठा शिवसेना वाढवायची आहे, असे म्हटले होते.
सामनाने मॉरिसला मोठे केले तर घोसाळकर यांच्या कामांना पाठिंबा मातोश्रीवरुन होता. दोघांमधील वाद उबाठा गटातील गँगवार आहे. मी नगरसेवक होणार की तू यावरुन त्यांच्यात वाद होता. दोघांमधील तडजोड ही उबाठामधील होती. फेसबूक लाईव्हमध्ये जी तडजोड झाली त्या मागे कोण आहेत. त्यांना तडजोड करण्यास सांगणारे कोण आहेत, हे तपास यंत्रणेने समोर आणले पाहिजे. त्यांची मिटींग का ठरली, कशी ठरली, कोणी ठरवली, कशासाठी झाली ? याची चौकशी झाली पाहिजे. या दोघांशी ज्यांचे संबंध होते, त्यांची चौकशी झाली पाहिजे.
आपल्या अंगावर आलेले पाप दुसऱ्याच्या माथी मारण्याचे काम होत आहे. कालची घटना चुकीची आहे. अशी घटना घडू नये. परंतु या प्रकरणाचे राजकारण केले जात आहे, यामुळे आम्हाला आमच्या पक्षाची भूमिका मांडावी लागली. एखादा फोटो ट्विट् करायचे आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करायची, हे उद्योग सुरु आहे. परंतु आताचे मुख्यमंत्री लोकांमध्ये जातात. त्यांना अनेक लोक भेटतात. आधी तसे नव्हते, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना लगावला.
हे ही वाचा