मुंबई : ब्रँडेड दूध प्यायला किंवा पॅकेट दूध घरी मिळत असेल तर सावधान. चांगल्या दुधाच्या ऐवजी भेसळयुक्त दूध काही ठिकाणी वाटलं जाऊ शकतं. कारण असाचं एक प्रकार उघडकीस आला. मुंबई गुन्हे शाखेने भेसळयुक्त दूध जप्त केले. ब्रँडेड कंपन्यांच्या दुधाच्या पॅकेटमध्ये पाणी मिसळून लोकांच्या घरी पोहोचवणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने कांदिवलीतील पोईसर परिसरातून छापा टाकून तीन आरोपींना अटक केली आहे.
दुधात भेसळीचं प्रकरण समतानगर पोलीस हद्दीत उघडकीस आलं. अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा 2006 नियम – नियमन 2011 नुसार ही कारवाई करण्यात आली. तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. विरय्या मल्लया चिरबोयना (वय 46 वर्षे), रवी तेलु बिसखामय (वय 30 वर्षे) आणि शंकर पेटय्या मंदरा (वय 42 वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.
मेणबत्ती, स्टोव्ह पीनपासून बनविलेले चिमटे, लाईटर, अमुल ताजा रिकाम्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, ब्लेड प्लॅस्टिक नरसाळे, गाळणी, स्टिलचे ग्लास, वाटी, 3 प्लॅस्टिकच्या हिरव्या रंगाच्या बादल्या, कैची, 3 मग ताब्यात घेण्यात आले. तसेच अमुल आणि गोकुळ या नामांकित कंपन्यांचे 13 हजार 698 रुपये किमतीचे 235 लिटर दूध ताब्यात घेण्यात आले.
सहायक पोलीस निरीक्षक सावंत यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली. भास्कर जंगम चाळ, रूम नं. 03, गावदेवी रोड, शिवाजी मैदानाजवळ, काजुपाडा, पोयसर, तसेच रूम नं. 10, 3, सी, गोकुळ गॅलेक्सी बिल्डींगजवळ, गावदेवी रोड, पोयसर, आणि रूम नं. 6, चाळ नं. 01, गावदेवी रोड, पोयसर, मुंबई या ठिकाणी दुधात भेसळ करण्यात येते. अमूल आणि गोकुळ या नामांकित कंपन्याचे दुधाच्या पिशव्यांत अस्वच्छ पाणी मिसळले जाते. ते भेसळयुक्त दूध ग्राहकांना वितरित करण्यात येते.
हे भेसळयुक्त दूध लहान मुले आणि नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. 25 मार्च रोजी सपोनि सावंत आणि पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न आणि औषध प्रशासन विभाग, तुषार घुमरे आणि सुमित खांडेकर यांच्यासह वरील ठिकाणी छापा टाकला. याठिकाणी वर नमुद तीन आरोपी हे अमुल आणि गोकुळ या नामांकित कंपन्याचे दुधाच्या पिशव्यामधील दूध काढून त्यामध्ये अस्वच्छ पाणी मिसळताना आढळले. या आरोपींना ताब्यात घेवून मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाई समता नगर पोलीस करतील.