मुंबई: राजकीय पोस्ट केल्यामुळे ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा दावा अभिनेते किरण माने (kiran mane) यांनी केला होता. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले होते आणि मानेही चांगलेच चर्चेत आले होते. हा वाद संपतो न् संपतो तोच माने यांनी आता दुसऱ्या नव्या वादात उडी घेतली आहे. आता त्यांनी सिनेमाशी संबंधित वादात उडी घेतलेली नाही. तर दोन विचारवंतांच्या वादात उडी घेतली आहे. ज्येष्ठ विचारवंत हरी नरके (hari narke) आणि विश्वंभर चौधरी (vishwambhar chaudhari) यांचा गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यावर नरके यांनी फेसबुकवर मोठी पोस्टही लिहिली आहे. या पोस्टवर माने यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना चौधरी यांचा उल्लेख वेडसर माणूस असा केला आहे. त्यामुळे आता या वादाचे पडसाद आणखी उमटण्याचे चिन्हे दिसत आहेत.
अभिनेते किरण माने यांनी ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. वेडसर माणूस आहे तो. परवा अण्णांवर बोलत असताना तो निरूत्तर झाल्यावर अचानक माझ्यावर पर्सनल चिखलफेक सुरू केली. अर्थात मी तिथंही सोडलं नाही. पण एकंदरीत पहिल्या भेटीत ‘लायकी’ समजली, अशी घणाघाती टीका माने यांनी केली आहे. त्यामुळे विश्वंभर चौधरी आता त्यावर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विश्वंभर चौधरी सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. ठाकरे सरकारच्या समितीवर काम करायचे नी महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयावर तुटून पडायचे ही यांची रीत. आपण कुणाचे मिंधे नाही अशी गर्जना करीत इतरांना राजाश्रयवाले असे हिनवायचे नी स्वतः राजाश्रय घ्यायचा हे वागणे बरे नव्हे. आपण लोकशाहीवादी, परमतसहिष्णू, विवेकी, संवादी, पुरोगामी असल्याची प्रतिमा त्यांनी प्रयत्नपूर्वक तयार केलीय, अशी टीका नरके यांनी केली आहे.
1) दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेताच चौधरी त्यावर तुटून पडले. किरीट सोमय्या मराठी विरुद्ध कोर्टात जातात, हे मराठी पाट्यांवर तुटून पडतात. मी मराठी भाषेचा अभिमानी असल्याने मला त्यांच्याविरुद्ध लिहिणे भाग पडले. तर ते रागावले.
2) 24 ×365 अहोरात्र किरीट सोमय्याचे स्वातंत्र्य व अण्णा हजारे यांची प्रत्येक कृती यांचे समर्थन करणाऱ्या, भाषेचे व्याकरण इतरांना शिकवणाऱ्या चौधरींनी किरण मानेंच्या ज्या शब्दांवरून त्यांच्याविरुद्ध अभियान सुरू केले, ते स्वातंत्र्य अमोल कोल्हे यांना मात्र त्यांनी नाकारले. तेच असंसदीय शब्द जेव्हा यांच्या लाडक्या देवेंद्रजीच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वापरले तेव्हा मात्र त्या शब्दांवर मौन धारण करीत बाईने नामर्द शब्द वापरू नयेत अशी कोमट पोस्ट ते टाकते झाले. असा भेदभाव का?
3) अण्णा हजारे यांनी सात वर्षाच्या झोपेतून जागे होत शुद्धताचार्य असलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांना राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या चौकशीचे पत्र लिहिले. तेव्हा अण्णा हे सोमय्या यांच्याच छावणीतले स्वयंसेवक असल्याचे उपरोधाने मी त्यांची नावे बदलून लिहिले. तर विश्वंभर अपार चवताळले. माझ्यावर तुटून पडले. खरंतर हजारे आमचे शेजारी आहेत. (मी शिरूरचा ते पारनेरचे. आमच्यामध्ये घोडनदी आहे) आमचे आम्ही बघून घेऊ ना! “बीच मे मेरा चांदभाई” ही भूमिका घ्यायची विश्वंभरबापूंना गरजच काय?
4) सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला द्यायला विरोध करणारा लेख चौधरींनी चवताळून लिहिला. तेव्हा “सावित्रीला नकार, गर्जे विश्वंभर” असा सणसणीत प्रतिवाद मला करावा लागला होता. त्यांच्या सावित्रीबाई फुले विरोधी अभियानाचा पार बोऱ्या वाजला. कोणाचीच साथ न मिळाल्याने ते एकटे पडले आणि तो राग त्यांनी तेव्हा मनात दाबून ठेवला.
5) आमच्या प्रयत्नांनी विद्यापीठात सावित्रीबाईंचा पुतळा बसला आणि विश्वंभरबुवांचा तो दाबून ठेवलेला परिवर्तनवाद्यांवरचा राग उफाळून वर आला. एरवी सहिष्णुता, विवेक, संवाद, लोकशाही असा अहोरात्र रतीब घालणारे चौधरी आपला तोलच घालवून बसले नी मैत्री तोडायची जाहीर धमकी फेसबुकवर देऊ लागले. त्यावर मीडियात लेखही आले. मतभेद होते, आहेत पण म्हणून मैत्री का तोडायची? मग आगरकरी बाणा “विचारकलहाला घाबरू नका” चे काय? संवाद तोडून वैर करणे ही कोणती लोकशाहीरीत?
6) सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण चौधरींच्या सर्वात लाडक्या राज्यपालांच्या हस्ते झाले नी त्याच दिवशी चौधरींनी मला त्यांच्या मित्रयादीतून काढून टाकले.
7) मी त्यांना मित्रयादीतून वगळलेले नाही. त्यांनी मला मित्रयादीतून बाहेर काढलंय हे मित्रांना कळावे यासाठी ही पोस्ट!
चौधरी यांननीही नरके यांच्या पोस्टला उत्तर दिलं आहे. प्रा. हरी नरके यांची एक पोस्ट पाहण्यात आली. त्या पोस्टमध्ये मी महाविकास आघाडी सरकारवर टीका करतो आणि त्याच वेळी सरकारच्या समितीचे लाभ घेतो असा आरोप त्यांनी केला. प्रबोधनकार ठाकरे यांचे जे तीन ग्रंथ संपादित करण्यात आले त्याचे स्क्रीन शॉट्स त्यांनी टाकले आहेत. ते इथे पहिल्या कॉमेंटीत दिले आहेत.
1. पहिली गोष्ट म्हणजे ही समिती नव्हती, फक्त संपादक मंडळ होते. कोरोना काळात हे काम झाल्यामुळे मंडळाची प्रत्यक्ष बैठक झाली नाही. संपादनाचा जवळपास सगळाच भाग सचिन परब यांनी सांभाळला. यासाठी संपादक मंडळाला कोणताही भत्ता नव्हता. सरकारचा एकही पैसा मी घेतला नाही. प्रकाशन सोहळ्याला मी ओला टॅक्सी घेऊन गेलो होतो. सांस्कृतिक खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती रक्कम देऊ केली मात्र मी सरकारी पैसे घेत नाही हे कारण देऊन नम्र नकार दिला. शासनाचा एक पैसाही या संपादक मंडळात काम करतांना माझ्या नावे खर्च पडला नाही.
2. लोकायुक्त कायद्याच्या मसुदा समितीवर येण्याची माझी इच्छा नव्हती. पण माधवराव गोडबोले सर आणि न्या. संतोष हेगडे या समितीत काम करू शकले नाहीत म्हणून मला त्या समितीत जावं लागलं. ही समिती आधीच्या सरकारनं नियुक्त केली होती. समितीच्या आजपर्यंत सात-आठ किंवा जास्तच बैठका झाल्या आहेत. पण एकाही बैठकीत भत्ता म्हणून किंवा प्रवास खर्च म्हणून आम्ही म्हणजे अण्णा, ॲड. श्याम असावा, संजय पठाडे आणि मी या अशासकीय सदस्यांनी एक पै चाही भत्ता किंवा प्रवास खर्च घेतलेला नाही.
3. जे.एस. सहारिया राज्य निवडणूक आयुक्त असतांना त्यांनी निवडणूक सुधारणा या विषयासाठी अनेकदा मला विविध बैठका आणि उपक्रमात सामील केलं. या सगळ्या कामातंही मी शासनाचा एक ही पैसा भत्ता म्हणून घेतलेला नाही.
4. व्याख्यानासाठी लोक मानधन विचारतात तेव्हा मी मानधन घेत नाही असं स्पष्टपणे सांगतो. इतक्यावर आग्रह केलाच तर मी माझ्या माहितीतल्या सामाजिक संस्थांच्या नावे चेक परस्पर पाठवण्याचा सल्ला देतो.
5. ज्यांच्याशी मी संलग्न आहे अशा अनेक सामाजिक संस्था आहेत. त्यातला कोणत्याही संस्थेचा एक रूपयाही माझ्याकडे आलेला नाही, उलट मीच जमेल तशी आर्थिक मदत करत आलो आहे.
6. अनेक लेख वर्तमानपत्र आणि मासिक, दिवाळी अंकातून लिहीले पण मानधन मात्र नाकारत आलो आहे. वर्तमानपत्रांचे मानधनाचे चेक परत पाठवलेले आहेत.
जिथं कीर्तन केलं तिथला बुक्का सुद्धा भाळी लावून घेऊ नये असं तुकोबांनी सांगितलं. ते पाळत आलो. आर्थिक स्थितीही पहिल्यापासून उत्तम असल्यानं व्याख्यानाला उत्पन्नाचं साधन कधीच समजलो नाही. आजवर मी जिथं जिथं व्याख्यानं केली ते संयोजक याची साक्ष देतील. आयुष्यात पहिल्यांदाच माझ्यावर आर्थिक स्वरूपाचा आरोप झाला. प्रा. हरी नरके यांच्याशी फोनवर बोलून हे सगळं व्यक्त केलं. मात्र पोस्ट वरून गैरसमज होऊ नयेत म्हणून हा खुलासा. ज्या दिवशी एका पैश्याचाही आरोप सार्वजनिक आयुष्यात सिद्ध होईल त्या क्षणापासून फेसबुक तर सोडाच, सार्वजनिक आयुष्यातून निवृत्त होईल.
संबंधित बातम्या
राऊत आमच्या कुटुंबाचा भाग, पण आमच्यात कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत; सुजित पाटकर EXCLUSIVE
नवी मुंबईकरांचा मुंबईला पोहोचण्याचा वेळ 30 मिनिटांवर, वॉटर टॅक्सीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम