मुंबईः संपलेल्या पक्षावर मी उत्तर देत नाही. भगवान श्रीराम हे आमच्या मनात आहेत, म्हणत शिवसेना (Shiv Sena) नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी अवघ्या एका वाक्यात महाराष्ट्र नवनिर्माण (MNS) सेनेचा विषय संपवला. आदित्य यांनी आज परळ येथील डिलाइल ब्रिजच्या कामाची पाहणी करण्यासाठी हजेरी लावली. त्यांच्यासोबत महापालिकेचे अधिकारी, सचिन अहिर, सुनील शिंदे उपस्थित होते. या पुलाच्या कामासाठी खूप वेळ लागला. त्यामुळे मुंबईकरांना त्रास हा सहन करावा लागला. हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. वरळीकरांच्या अनेक ग्रुपमध्ये या ब्रिजचे नाव आता डिले रोड करण्यात आले आहे. या कामासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. महापालिकेकडून या पुलाचे काम झाले आहे. आता फक्त गर्डर टाकण्यासाठी रेल्वेची परवानगी हवी आहे. या विकासाच्या कामात किंवा कोणत्यातही इतर विकास कामात कोणीही राजकारण करेल, असे मला वाटत नाही, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, मनसे पक्ष म्हणून संपला की नाही हे जनता ठरवेल, पण शिवसेनेचे हिंदुत्व संपले आहे. आम्ही सेना भवनसमोर हनुमान चालीसा म्हणून यांना राग का येतो, असा सवाल त्यांनी केला. आदित्य ठाकरेंनी आमच्या पक्षाबाबत बोलू नये. शिवसेना ही मुस्लिम लीग सेना झाली आहे का, शिवसेना स्वतःला हिंदू म्हणते मग हनुमान चालीसा आम्हाला का लावू देत नाही, असा सवालही त्यांनी केला.
एका राज्याचा अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांत होणार आहे. शिवसेनाला काहीही करून महापालिकेतली सत्ता शाबूत ठेवायची आहे. तर भाजपने काहीही करून मुंबई महापालिकेत सत्ता आणायचा निर्धार केला आहे. राज्यातल्या या दोन्ही बलाढ्य पक्षात यावरून जुंपली आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच मनसे नेते राज ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्यावर स्वार झालेत. त्यांनी पाडव्याच्या भाषणातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावरूनही वादाच्या ठिणग्या पडतायत.
राज यांच्या बदलेल्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ते आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली. यात कोणी त्यांच्यावर आसूड ओढले, तर कोणी हिणवले. या साऱ्यांना राज ठाकरे काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे. राज यांची ठाण्यात मंगळवारी 12 एप्रिल रोजी सभा होतेय. त्याची जोरदार तयारी सुरू असून, सोशल मीडियावरही जाहिरातबाजी करण्यात येतेय.