मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुसळधार पाऊस साचलेलं पाणी आणि यानंतर उद्भवणारे इतर साथीचे आजार यांचा विचार करुन मुंबई फिव्हर क्लिनिक्स सुरु करण्याचे आदेश दिलेत. मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेण्यात आला. या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी हे आदेश दिले. यावेळी बैठकीला मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख हेही उपस्थित होते.
पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील सध्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे असं सांगत महत्वाच्या सूचना केल्या. ते म्हणाले, “पाऊस ओसरल्यावर मलेरिया, डेंग्यू, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. कोविडचा धोका तर कायम आहे. यासाठी ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक्स सुरु करा. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी देखील नागरिकांना त्यांच्या तापाबाबत तपासणी व मार्गदर्शन हवे. गृहनिर्माण संस्थांमधून देखील याविषयी जनजागृती करा.”
पाऊस ओसरल्यावर मलेरिया, डेंग्यू, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते, कोविडचा धोका कायम आहे. त्यासाठी ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक्स सुरू करण्याच्या सूचना मी केल्या आहेत.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 18, 2021
“मुंबईत दरडी कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षक भिंती आहेत. मात्र, अशा सर्वच ठिकाणांचा आयआयटी किंवा इतर तज्ज्ञ संस्थेमार्फत अभ्यास करून आणखी काही पर्याय आहेत का किंवा त्यांच्या मजबुतीकरणासंदर्भात पाऊले उचलता येतील का ते पाहावे. रेल्वे आणि बेस्ट यामध्ये अधिक चांगला समन्वय साधून अशा आपत्तीच्या वेळी प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून हॉटलाईन सुरु करावी,” असंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.
पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील पुढील 3 दिवस महत्वाचे असून मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु राहील याची काळजी घ्यावी व पर्यायी व्यवस्था करावी असे सांगितले. वीज वाहिन्या व त्यांचे खांब सुस्थितीत राहतील आणि त्यातून विजेचा धक्का लागणार नाही याविषयी कंपन्यांना खबरदारी घेण्यास सांगावे असंही ते म्हणाले.
मुंबईतील जोरदार पावसाबाबत माहिती देताना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले, “काल रात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस कोसळून अवघ्या काही तासांमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. या पावसात वाशीनाका परिसरातील वंजारतांडा येथे संरक्षक भिंत कोसळली. तसेच विक्रोळीतील पंचशील चाळीवर दरडीचा भाग कोसळला. या दोन प्रमुख दुर्घटनांसह अन्य एक घटना मिळून एकूण 27 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. या दुर्घटनांच्या स्थळी बचाव आणि मदतकार्य तातडीने करण्यात आले आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्यासह भेटी देवून यंत्रणांना आवश्यक ते निर्देश दिल्याचेही चहल यांनी नमूद केले.
उपनगरीय रेल्वे रुळांवर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या अनुषंगानेही चहल यांनी माहिती दिली. “माहूल येथील पर्जन्य जल उदंचन केंद्राचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहे. हे केंद्र पूर्ण झाल्यानंतर कुर्ला, शीव, चुनाभट्टी इत्यादी परिसरातील पाणी साचण्याचा प्रश्न निकाली निघेल. मुंबईत पावसामुळे होणाऱ्या भूस्खलन घटना पाहता, संभाव्य ठिकाणांवर महानगरपालिका प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. अशा ठिकाणांवरील नागरिकांचे स्थलांतर व पुनर्वसन करण्याबाबतची कार्यवाही देखील करण्यात येत आहे,” असं आयुक्तांनी नमूद केलं.