विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी वरळी मतदार संघ चर्चेत आला आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात महायुतीकडून संदीप देशपांडे उमेदवार असणार असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी वरळीत कमळ फुलू देणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यावर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी वक्तव्य केले आहे. आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतात की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात हे पहावं लागेल, असा पलटवार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करून महाविकास आघाडीने मतदान मिळवले आहे. परंतु ही टेम्पररी गोष्ट आहे. मात्र येत्या विधानसभेत महायुतीचेच सरकार येणार आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीने लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवला. तो नॅरेटिव्ह आम्ही पुसू शकलो नाही. ‘संविधान खतरे मे, संविधान बचाव’, अशा सगळ्या खोट्या सांगून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केले गेले. त्या गैरसमजामुळे एकगट्टा मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केले गेले. त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला असेल. मात्र ही टेम्पररी गोष्ट आहे. ही पर्मनंट अरेंजमेंट नाही, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
कल्याणमध्ये आचारी अत्रे रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुनील तटकरे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. यावेळी राष्ट्रवादी भाजप व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार शिंदे यांनी म्हटले की, लोकांच्या दिशाभूल एकदा करू शकतात. वारंवार दिशाभूल होत नसते. येत्या विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील. राज्यात पुन्हा महायुती सरकार महाराष्ट्रात येईल असा विश्वास व्यक्त केला .
वरळी मतदारसंघात 40 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल असे त्यांना वाटत होते. मात्र लोकांनी त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. वरळी मतदारसंघात फक्त 6 हजार मताधिक्य दिले. त्यांना वाटत होते मराठी माणूस त्यांच्यासोबत आहे. मात्र मराठी माणूस खऱ्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या बाजून आहे. मराठी व्यक्ती बाळासाहेबांच्या बाजूने उभा राहिला आहे. हे त्यांनी मतपेटीतून दाखवून दिले.
शिवसेनेला 19% जे मतदान शिवसेनेला होत होते. त्यातील साडेचौदा टक्के मतदान हे खऱ्या शिवसेनेला झाले आहे. सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून पदवीधर मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्याच लोकांनी कुठे कुठे पैसे वाटण्याचे काम चालू आहे, असा पलटवार केला.