विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणी एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याच याचिकांवर एकत्र सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला. पण त्यांच्या या युक्तिवादावर शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी आक्षेप घेतला. अनिल साखरे यांनी मांडलेला युक्तिवादाची सविस्तर माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अनिल साखरे यांनी यावेळी शेड्यूल 10 च्या मुद्द्यावरुनही भूमिका मांडली.
“निवडणूक आयोगाचा निकाल हा आमच्याबाजूने आहे. आम्हीच खरा पक्ष आणि आयोगान पक्ष आणि चिन्ह आम्हाला दिले असताना आम्हाला अपात्र करण्याची नोटीस कशी काय देऊ शकता? आम्हाला शेड्यूल 10 (पक्षांतरबंदी कायदा) लागू होत नाही”, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी केला.
ठाकरे गटाकडून शिंदेंविरोधात अपात्रतेच्या याचिका जून आणि जुलैमध्येच दाखल केल्या होत्या. सुनील प्रभू यांनी 16 याचिका दाखल केल्या होत्या. त्यानंतर तीन आमदारांविरोधात एकत्रित निलंबनाची याचिका केली. त्यानंतर 40 आमदारांविरोधात एकत्रित निलंबनाची याचिका दाखल केली, असा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.
बच्चू कडू यांचे वकील प्रविण टेंभेकर यांनी सांगितले की, “ठाकरे गटाने आताच निकाल देण्याची मागणी केली. मात्र साक्ष नोंदवणे, संबंधीत कागदपत्रे तपासणे, यासाठी वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.” यावेळी शिंदे गटाच्या वकिलांनी आपली भूमिका मांडली. प्रत्येक आमदारांची स्वतंत्र सुनावणी झाली पाहिजे, अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केली.
यावेळी विधानसभा अध्यक्षांनी 13 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होईल, असं जाहीर केलं. प्रत्येक आमदारांविरोधातील याचिका एकत्रित चालवायची की वेगवेगळी घ्यायचा याचा निर्णय 13 ऑक्टोबरला होईल, असं अध्यक्षांनी सांगितलं. ठाकरे गटाच्या वकिलांचे म्हणणे होते की, इव्हिडन्स दाखल करण्याची काहीही गरज नाही. तर शिंदेंच्या वकिलांनी पुरावे दाखल करण्याची मागणी केली. दोन्ही गटांच्या युक्तीवादानंतर अध्यक्षांनी आजचा निर्णय राखून ठेवला.
ही घटना एकच आहे. घटनाक्रम एकच आहे. एकत्रित सुनावणी घेऊन आजच निर्णय द्या, असा युक्तीवाद ठाकरे गटाने केला. दुसरीकडे शिंदे गटाच्या वकीलांचे म्हणणे आहे की, प्रत्येकाची बाजू वेगवेगळी आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या परिस्थितीत शिंदेंसोबत गेला आहे. त्यामुळे सर्वांना एकाच धाग्यात ओवणे योग्य नाही. वेगवेगळी सुनावणी झाली पाहिजे.