मुंबई– शिवसेनेत झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर, याच्याशी आपला संबंध नाही, असे सांगत असलेले भाजपा नेते आता सत्ताबदलाच्या तयारीला लागले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर, आता भाजपाचे 106आमदार गोवा किंवा गुजरातला हलविण्यात येणार असल्याची माहिती आहे. याची जबाबदारी नितेश राणे यांच्याकडे देण्यात आल्याची माहितीही मिळते आहे. भाजपाच्या 106आमदारांपैकी कुणाला गळाला लावू नये, यासाठी सावधगिरी म्हणून आता भाजपाच्या आमदारांना दुसऱ्या राज्यात हलविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
विधान परिषदेच्या निकालात भाजपाच्या विजयानंतर, रात्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसोबत नॉट रिचेबल झाल्यानंतर सकाळी राज्यात याची चर्चा सुरु झाली. त्याचवेळी भाजपाचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झआले आहेत. तिथे त्यांची भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि इतर काही वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याचे सांगण्यात येते आहे. त्यानंतर फडणवीस हे गुजरातमध्ये जातात का, अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपासोबत जाण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे.
आता शिवसेना नेत्यांशी सूरतमध्ये झालेल्या चर्चेनंतर शिवसेनेच्या आमदारांना गांधीनगर येथे हलवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. या भेटीत पुढील सगळा सत्ताबदलाचा घटनाक्रम फायनल होण्याची शक्यता आहे.
नव्या फॉर्म्युल्यानुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आगामी काळात होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले तर उद्धव ठाकरे यांचे सरकार अडचणीत येईल. त्यानंतर फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सत्तास्थापनेचा दावा दाखल करण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडूनही हे बंड मोडून काढण्याची तयारी सुरु असल्याची माहिती आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी अजित पावरांची भेट घेणार आहेत. त्यानंतर शिवसेना आमदारांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर रात्रीपर्यंत पुढे काय पाऊल उचलायचे हे ठरवण्यात येणार आहे. आता एकनाथ शिंदे यांचे बंड निशअचित मानले जाते आहे. अशा स्थितीत आता राज्यात सत्ताबदल निश्चित मानण्यात येतो आहे.