मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : दिवाळीचा उत्सव सुरु झाला असताना मुंबईकरांवर प्रदूषणाचे संकट आले होते. मुंबईत हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रदूषणाचा एक्यूआय 200 वर गेला होता. मुंबईतील प्रदूषणाची ही सर्वोच्च पातळी होती. चार दिवसांत प्रदूषणाची पातळी सुधारा, अन्यथा विकास कामे बंद करु, असे खडे बोल उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई मनपाला सुनावले होते. त्यानंतर राज्य सरकार सक्रीय झाले. राज्य सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने बैठक घेतली. शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अगदी कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु एका पावसाने मुंबईकरांची चिंता मिटवली.
मुंबईतील प्रदूषणाची गुणवत्ता सुधारली आहे. मुंबईत गुरुवारी रात्री पाऊस झाला. मुंबईतील अनेक भागांत तासभर झालेल्या या पावसामुळे मुंबईची हवेची गुणवत्ता सुधारली आहे. या पावसामुळे 200 च्या वर गेलेला एक्यूआयची गुणवत्ता सुधारली आहे. आता हा एक्यूआय 94 वर आला आहे. यामुळे मुंबईकरांना श्वास घेणे सोपे झाले आहे. मुंबई हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबईचे तापमान शुक्रवारी 24 ते 30 अंश सेल्सियस होते.
उल्हासनगरने प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईलादेखील मागे टाकले आहे. मुंबईची हवेचा गुणवत्ता घसरली असताना उल्हासनगर येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा गुरुवारी २०० च्या वर गेला होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर ही नोंद करण्यात आली होती. प्रदूषणाच्या बाबतीत उल्हासनगरने मुंबईलादेखील मागे टाकले होते. यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षावर मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी काय-काय उपाययोजना करता येतील? यासाठी बैठक घेतली. यावेळी रस्त्यावर धूळ, बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ आणि माती दिसता कामा नये, असे स्पष्ट आदेश दिले. तसेच हजार टँकरच्या माध्यमातून मुंबईतील सर्व रस्ते पाण्याने धुवावे, असे आदेश दिले. परंतु पावसामुळे सध्या त्याची गरज पडली नाही.