शरद पवार यांच्यानंतर संजय राऊत यांनाही धमकी, सकाळी नऊचा भोंगा बंद करा, अन्यथा…

| Updated on: Jun 09, 2023 | 11:44 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. एकाच दिवसात राज्यातील दोन मोठ्या नेत्यांना धमक्या आल्या आहेत.

शरद पवार यांच्यानंतर संजय राऊत यांनाही धमकी, सकाळी नऊचा भोंगा बंद करा, अन्यथा...
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ट्विटरवरून एका व्यक्तीने ही धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकाच दिवसांत महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यामुळे खळबळ माजली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. संजय राऊत यांना यापूर्वी जीवे मारण्याची धमकी आली होती.

राऊत यांना यापूर्वी धमकी

संजय राऊत यांना यापूर्वी एप्रिल महिन्यात धमकी आली होती. या प्रकरणी पुण्यातून एका तरुणाला ताब्यात घेतले होते. राहुल तळेकर याला ताब्यात घेण्यात आले होते. आता पुन्हा संजय राऊत यांना ८ जून रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास धमकी आली. ही धमकी सुनील राऊत यांच्या फोनवर आली. फोन करणारा व्यक्ती हिंदीतून बोलत आहे. त्याने संजय राऊत यांना सकाळी ९ चा भोंगा बंद करायला सांगा, त्यासाठी एका महिन्याची मुदत देतो, अन्यथा त्यांना गोळी मारु, अशी धमकी दिली आहे. महिन्याभरात दोन्ही भावांना गोळी मारुन स्मशानात पोहचवणार असल्याचे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडे तक्रार

संजय राऊत आणि सुनील राऊत यांना आलेल्या धमकी प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.
सुनील राऊत यांनी यासंदर्भातील ऑडियो क्लिप मुंबई पोलिसांना दिली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना वारंवार धमक्या येत आहे. परंतु सरकार दखल घेत नाही. यामुळे विरोधकांना संपवण्याची सुपारी सरकारने तर घेतली नाही ना? असा सवाल सुनील राऊत यांनी उपस्थित केला.

शरद पवार यांनाही धमकी

राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे. तसेच सौरभ पिंपळकर याने ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकी दिली आहे. आयुष्यभर सुपारी कात्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाच तोंड मरताना वाकडं झाले, हे खरं आहे का? असं असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार.., अशी धमकी सौरभ पिंपळकर या ट्विटर अकाऊंटवरून ही देण्यात आली आहे.