मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, ‘कृष्णकुंज’वरील हालचालींना वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पक्षातील नेते आणि पक्षाच्या संघटनांचे नेते यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. सकाळी 11 वाजता ही बैठक राजगडावर म्हणजेच मनसेच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
अजित पवार यांनी कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला आघाडीत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विशेष पुढाकार घेतल्याचे दिसून येते आहे. त्यातच अजित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर तर या चर्चेला आणखी बळ मिळालं आहे.
मनसेचे सर्व सरचिटणीस, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कामगार संघटनांचे नेते इत्यादी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत. मनसेचं मुख्यालय असलेल्या राजगडावरच सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीकडे आणि बैटकीनंतर राज ठाकरे काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आघाडीत जाण्यासंदर्भात मनसे काय निर्णय घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यासंदर्भातच राज ठाकरेंच्या आजच्या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
काल राज ठाकरेंना भेटल्यानंतर अजित पवार काय म्हणाले?
“होय, मी राज ठाकरे यांना भेटलो. मोदीविरोधी सर्व पक्ष, नेते एकत्र यावेत, हे माझे मत आहे. अंतिम निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे.”, असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे यांना आघाडीत घेण्यासंदर्भात सहमती दर्शवली. तसेच, “कधी काळी भाजपाचा पाठिंबा घेणाऱ्या मायावतीही आज मोदी विरोधात आहेत. भाजपसोबत असणारे चंद्राबाबू नायडू विरोधात आहेत.”, असे म्हणत अजित पवारांनी मनसेला आघाडीत घेण्यासाठी विरोध करणाऱ्यांनाही उत्तर दिले आहे.