लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील तळेगावातील तब्बल 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितल्याच प्रकरण सध्या तापलं आहे. बोर्डाने याबद्दल लातूरच्या 103 शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. आज वक्फ बोर्डाचे चेअरमन समीर काझी यांनी मुंबईत याविषयी बोलताना स्पष्टीकरण दिलं. “ज्या नोटीसेस लातूरच्या शेतकऱ्यांना मिळ्याल्या, त्या नोटिसेस आम्ही दिलेल्या नाहीत. एका व्यक्तीने वक्फ ट्रिब्युनल कोर्टात जागेबाबत दावा दाखल केलेला आहे तिथून ह्या नोटिसेस जारी झाल्या आहेत” असं समीर काझी यांनी सांगितलं. “या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. या प्रकरणात कुणी नोटीसेस दिल्या याचा आम्ही शोध घेत आहोत” असं ते म्हणाले.
“यासाठी आम्ही एक समिती तयार केली आहे, ज्याचा रिपोर्ट आम्हाला मिळणार आहे. 183 नोटीसेस आहेत याची सखोल चौकशी सुरू आहे. वफ्फ ट्रिब्युनल कोर्टकडून ह्या नोटीसेस गेल्या आहेत, वक्फ बोर्डाकडून गेल्या नाहीत” असं स्पष्टीकरण समीर काझी यांनी दिलं. “आमच्याकडून डिस्ट्रिक्ट टिम तिथे जाणार आणि चौकशी करणार. तपासणी करणार, कायदेशी कारवाई व्हायला हवी” असं समीर काझी म्हणाले.
‘याचं राजकारण होतंय’
“हा मुद्दा संसदेत आहे, त्यामुळे आम्ही यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही. पण याचं राजकारण होतंय आणि आमची बदनामी हेतेय ती होऊ नये याची दखल घेतली जाणार. वक्फ बोर्डाची स्वत:ची जमीन नसते. धार्मिक कामांसाठी ही जमिन वक्फ केली जाते, त्याचं कामकाज व्यस्थित सुरू आहे की नाही, ते पाहण्यासाठी आमचा बोर्ड आहे. त्याची निगराणी आम्ही करतो” असं वक्फ बोर्डाचे चेअरमन समीर काझी म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरेंनी या विषयी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यात राज ठाकरेंनी वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणाऱ्या विधेयकात नक्की काय होतं याबद्दलची माहिती दिली. राज ठाकरेंनी राज्य सरकारने अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही. त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे पहावं, असाही सल्ला दिला. त्यावर समीर काझी म्हणाले की, “राज ठाकरे यांना बोलण्याचा अधिकार, पण त्यांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही”