मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : मुंबई विमानतळावर विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आलीय. अपघातग्रस्त विमान हे खासगी विमान आहे. खराब हवामानामुळे विमान क्रॅश झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दुर्घटनेनंतर मुंबई विमानतळावरील विमानांची टेक ऑफ आणि लँडिंग बंद करण्यात आलीय. हे खासगी विमान विशाखापट्टनम येथून मुंबईला आलं होतं. या विमानात 6 जण होते. तसेच 2 क्रू मेंबर्स होते. या अपघातात आतापर्यंत तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर जण सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.
संबंधित घटना ही आज संध्याकाळी 5 वाजून 2 मिनिटांनी घडली. विशाखापट्टनमच्या विझाग येथून निघालेलं विमान मुंबई विमानतळावर लँडिंगसाठी खाली उतरत होतं. यावेळी प्रचंड पाऊस पडत होता. खराब हवामान होतं. त्यामुळे लँडिंग करत असताना जमिनीच्या अवघ्या काही अंतरावर असताना हे विमान क्रॅश झालं. हे विमान रनवे 27 येथे लँड होणार होतं. पण त्याआधीच ही दुर्घटना घडली.
विमान क्रॅश झाल्यानंतर तातडीने पोलीस, एयरपोर्ट अथॉरिटी टीम, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा पथकांनी तातडीने विमानात असलेले क्रू-मेंबर्स आणि इतर नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले. अपघातग्रस्त विमानातून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. या विमान अपघातात तीन जण जखमी झाले. तर पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलंय. या घटनेमुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम पडलाय.
मुंबई विमानतळावर दररोज एकूण 900 विमानांची ये-जा होते. विमान क्रॅश झाल्याने काहीवेळासाठी मुंबई विमानतळावर टेक ऑफ आणि लॅन्डिंग बंद असल्याने, मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईहून जाणाऱ्या विमानाचं वेळापत्रक कोलमडलं आहे. मुंबई एअरपोर्टचा हा रनवे क्लिअर करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. खराब हवामामुळे हे प्लेन क्रॅश झाल्याचं सांगण्यात येत असलं, तरी याची मात्र चौकशी नक्कीच होवू शकते. मुंबईतून दररोज 2 ते 4 लाख विमानप्रवासी विमान प्रवासासाठी ये – जा करतात.