पेट्रोल 65 पैसे आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त, अजित पवारांची मोठी घोषणा

| Updated on: Jun 28, 2024 | 3:25 PM

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात इंधन दरात घट करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरात पेट्रोल-डिझेलचा दर बऱ्यापैकी स्वस्त होणार आहे.

पेट्रोल 65 पैसे आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त, अजित पवारांची मोठी घोषणा
Follow us on

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेल वरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग आणि व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे वरुन २५ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे ६५ पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे २ रुपये ७ पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे.

“2024-25 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा सुधारित कर अंदाज ३,२६,३९७ कोटी आहे. या आर्थिक वर्षाच्या महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दीष्ट ३,४३,०४० कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग केंद्रांना दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल-डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे”, असं अजित पवार म्हणाले.

‘या’ दलातील जवानांना व्यवसाय करातून सूट

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात पाच केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सूट दिली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक व सशस्त्र सीमा दल यातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट दिली आहे. याचा लाभ अंदाजे बारा हजार जवानांना होईल.

नोंदणी झालेल्या दस्तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याचे निष्पन्न झाल्यास, मुद्रांक शुल्काच्या फरकाच्या रक्कमेवर दस्त निष्पादित केल्याच्या तारखेपासून आकारण्यात येणारी दंडाची रक्कम दरमहा २% वरुन १% करण्यात येणार. तसेच मुद्रांक शुल्क परताव्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची कालमर्यादा मुद्रांक खरेदी केल्यापासून सहा महिन्यांऐवजी एक वर्ष करण्यात आली आहे.