मुंबईः नागपूर, अमरावती आणि औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार आघाडीवर राहिल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यानी आता भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. नाशिक आणि नागपूरच्या जागेवर महाविकास आघाडीने जोरदार कंबर कसली होती. कोकणाचा निकाल भाजपच्या बाजूने लागल्याने विरोधकांनी त्यांच्यावर हा पैशाचा खेळ होता अशी टीका केली आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निकालाविषयी बोलताना सांगितले की, विधान परिषदेचा हा निकाल राज्यातील सत्ताधाऱ्यांना चपराक लगवण्यासारखा आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आली होती. तर मतदान झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही आपलेच उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला होता.
मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या बालेकिल्यातच महाविकास आघाडीचा उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराला दुप्पट मतं घेऊन पराभूत केल्याने अजित पवार म्हणाले की, भाजपच्या हक्काच्या जागा पण अडचणीत आल्या आहेत. त्यामुळेच राज्याचा हा निकाल सत्ताधाऱ्यांना योग्य धडा शिकवणारा आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघाकडे सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या उमेदवारीमुळे सगळ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीला धक्का बसला होता. तर भाजपने सत्यजित तांबे यांनी जर जाहिररित्या पाठिंबा मागितला तर आम्ही देऊ असं जाहीर केलं होतं.
त्यामुळे तांबे पितापुत्र काँग्रेसचे उमेदवार असले तरी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे निकाला नंतर सत्यजित तांबे काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
त्यांच्या या निर्णयाबद्दल अजित पवार यांनी बोलताना सांगितले की, सत्यजित तांबे यांच्या रक्तात काँग्रेस भिनली आहे, त्यामुळे ते निवडून आल्यावर योग्य तो निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले विजयी झाल्यामुळे अजित पवार म्हणाले की, या निवडणुकीचा नागपूरचा निकाल हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचार करायला लावणारा आहे असा खोचक टोला सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
तसेच सत्ताधाऱ्यांनी या निवडणुकीत सर्व गोष्टींचा वापर केला आहे असा गंभीर आरोपही अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी विजयासाठी सगळ्या गोष्टींचा वापर केला असला तरी त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा आजचा निकाल आहे त्याच बरोबर सर्वच राजकीय पक्षांनाही विचार करायलाही लावणारा निकाल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.