ठाणे, दि. 7 जानेवारी 2024 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे. मुख्यमंत्र्यांच्या या गडात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्यात आपल्या भाषणातून नाव न घेता त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्ला केला. जितेंद्र आव्हाड यांना इशारा दिला. शरद पवार यांना वय झाले आता कुठेतरी थांबायला हवे, असा सल्ला पुन्हा दिला. ठाणे जिल्ह्यात कोणाची दादागिरी खपवून घेणार नाही, असे सांगताना पोलिसांना दादागिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. एका अर्थाने मुख्यमंत्र्यांच्या गडात सत्तेतील मित्र असलेल्या शिवसेना, भाजपवर काहीच न बोलता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार यांनी घेरले.
वय झाल्यानंतर थांबायला हवे. पण काही जण ऐकत नाही. हट्टीपणा करतात. राज्य सरकारमध्ये ५८ वर्षांत निवृत्त होतात. काही जण ६२ तर काही जण ६५ मध्ये निवृत्त होतात. काही जण ७५ वर्ष निवृत्ती स्वीकारतात. परंतु काही जण मात्र ८० वर्षी थांबत नाही. ८४ वर्षांचे झाले तरी निवृत्त होत नाही, असे शरद पवार यांचे नाव न घेता अजित पवार यांनी म्हटले.
राज्यात वाचळविरांची संख्या वाढता आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत आहोत. विकासाची कामे करण्यासाठी सत्तेत आहोत. सार्वजनिक कामे झालीच पाहिजे. राज्यातील सर्व सामान्यांचे कल्याण ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. येत्या काळात संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा प्रश्न सुटणार आहे. कल्सटर योजनेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचा विकास करणार आहोत. उद्यापासून मी जिल्हानिहाय आढावा घेणार आहे. त्यावेळी ठाणे जिल्ह्यास जास्त निधी कसा देता येईल, याचा विचार आपण करणार आहोत. समृद्धी महामार्ग पूर्ण होत आला आहे. वंदे भारत ट्रेन सुरु झाली आहे. त्याचा फायदा होणार आहे.
ठाणे जिल्ह्यात कोण दादागिरी करतो. कोण दहशत निर्माण करतो. त्यांच्यावर पोलिसांनी डोळ्यात तेल घालून लक्ष दिले पाहिजे, अशी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता अजित पवार यांनी म्हटले. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार करा, असे अजित पवार यांनी सांगितले.