मुंबई : “शिवसेनेच्या फुटीची कल्पना आलेली होती, असं नाही. पण सरकारमध्ये काम करत असताना काही गोष्टी कानावर आल्या होत्या. थोडी नाराजी आहे, अमूक आहे, तमूक आहे. तेव्हा कोरोनाचा काळ होता. त्या काळात एकमेकांना भेटणं, मोक्याचा ठिकाणी गर्दी करणं, कार्यक्रम घेणं या सगळ्यांवर बंधनं होतं. ती बंधनं असल्यामुळे काही गोष्टी कानावर आले होते. तेव्हा चर्चा व्हायची”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मुख्य संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली.
“तुम्ही टीव्ही ९ चे प्रमुख आहात. टीव्ही ९ मधले तुमची खालची टीम आहे. त्यामधील कोणीतरी एखाद-दुसरा दुसरीकडे जायचा विचार करत असेल तर मी उमेशजींशी संपर्क साधणार. कारण त्यांच्याशी आमचे संबंध चांगले आहेत”, असं अजित पवार मिश्किलपणे म्हणाले.
“मी त्यावेळेस मंत्रिमंडळात होतो. मी राज्याचा उपमुख्यमंत्री होतो. शेवटी तुम्ही सरकारमध्ये काम करत असताना आपल्याला अडचणी होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जाते. आपलं सरकार व्यवस्थितपणे चालावं. त्यामध्ये काही अडचण येऊ नये, असा प्रयत्न केला जातो”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
“कधीकधी काही जणं मुद्दाम काही गोष्टी करतात ज्यावर वरिष्ठांनी बोलावं, चर्चा करावं. असं घडतंना बऱ्याचदा. नाराजी असेल तर ती कमी करण्यासाठी बैठक घेतो. समज-गैरसमज झाले असतील तर दूर करण्यासाठी चर्चा करतो. तशाचपद्धतीने मी कानावर घातलं होतं”, असं अजित पवारांनी सांगितलं.
“विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशी घडामोडी घडल्या. मला माहिती पडलेलं नव्हतं. मी माझ्या चेंबरमध्ये बसलो होतो. तिथे अब्दुल सत्तार आले. आम्ही एकत्र असल्यामुळे ते आले, बसले, आम्ही गप्पा मारल्या. आम्ही बरीच जणं होतो. तेव्हा नंतर मला काही आमदार बोलले”, असं अजित पवारांनी सांगितलं.
“एकनाथ शिंदे यांचा एक ग्रुप तिकडे फिरत होता. उद्धव ठाकरे त्यांच्या चेंबरमध्ये बसले होते. उद्धव ठाकरे स्वत: एकेक आमदाराशी बोलत होते. ते त्यांना काही सांगत असतील. अशा पद्धतीचं त्यांचं कामकाज चाललेलं होतं. ते कामकाज चालू असताना काही लोक पाहत होते आणि एक ग्रुप तयार झाला आणि ठाण्याला निघायचं असं झालं. त्यानुसार गाड्यांचा ताफा गेला”, असं अजित पवार म्हणाले.
“त्यानुसार तिकडच्या भागात मर्जीतले अधिकारी ठेवायचे. मी तुम्हाला वरिष्ठ अधिकारी म्हणून माझ्या भागात नेमलं. त्यानंतर या गाड्या जाऊद्या असं सांगितलं. तर अधिकाऱ्याने त्या गाड्या जाऊ दिल्या. असं सगळं झालं”, असं अजित पवारांनी सांगितलं.
“ज्यावेळेस १४-१५ आमदार गेले त्यावेळेस सरकार गेलं असं वाटत होतं. जे राहिले होते ते हळूहळू जात होते. पडद्याआड सगळ्या गोष्टी घडत होत्या. भाजपही आमचा काही संबंध नाही, असं बोलत होती. पण त्यांनी वेगळ्या पद्धतीने काही लोकांना पाठवलं. विमानं ठेवली होती”, असा दावा अजित पवारांनी केला.
“एकनाथ शिंदे सुरतला गेला तेव्हा आमचा आणि त्यांचा संबंध नाही. तिथे त्यांनी गेल्यानंतर कुणाशी संबंध ठेवावा तो त्यांचा प्रश्न होता. त्यावेळी मिलिंद नार्वेकर गेले होते. त्यांच्यासोबत चर्चा झाली होती”, असं अजित पवारांनी सांगितलं.