मी हा निर्णय… पक्ष ताब्यात आल्यानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया काय?

| Updated on: Feb 06, 2024 | 9:01 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा अजित पवार यांच्याकडे दिला आहे. पक्षाचं चिन्हही अजित पवार यांना दिलं आहे. अजितदादा गटासाठी हा मोठा दिलासा आहे. शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. आता शरद पवार गटाला नव्या पक्षाचं नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाला सूचवावं लागणार आहे. तर, या निर्णयानंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मी हा निर्णय... पक्ष ताब्यात आल्यानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया काय?
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखेर अजित पवार यांच्या गटाला मिळाला आहे. अजित पवार यांच्या गटाला पक्षासह चिन्हही मिळालं आहे. त्यामुळे अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले आहेत. निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने शरद पवार गटाला आता सर्वोच्च न्यायालयात जाण्यावाचून पर्याय राहिला नाही. तर दुसरीकडे पक्ष हातून गेल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना पक्षाविनाच सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. पक्षाशिवाय निवडणुकीला सामोरे जाण्याची शरद पवार यांच्या 63 वर्षाच्या राजकीय आयुष्यातील ही पहिलीच वेळ आहे. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय येताच राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबध्द होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज जनतेला दिला.

अध्यक्ष म्हणून जाहीर केलं

दरम्यान, अजित पवार यांनी ट्विटमध्ये स्वत:ला राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर केलं आहे. इतके दिवस अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष हा शब्द वापरला नव्हता. पण आज पहिल्यांदाच निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार यांनी स्वत:ला अध्यक्ष म्हणून घोषित केलं आहे.

 

काँग्रेसची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय केंद्र सरकारने लिहून दिलेला आहे. निवडणूक आयोगाने तो फक्त जाहीर केला. काही महिन्यांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशात एकही प्रादेशिक पक्ष अस्तित्वात राहणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर संस्था आणि निवडणूक आयोगाने मोदी सरकारच्या आदेशाने प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात केली आहे. अगोदर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जे झाले ते लोकशाहीची हत्या करण्याचाच प्रकार आहे. मोदी सरकार आणि निवडणूक आयोग केवळ विरोधी पक्षच नाही तर या देशातील लोकशाही संपवत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.