मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर ऐतिहासिक निकाल दिला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं आहे. त्यामुळे त्यांचया गटाला हा मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका घेतली. आमच्या बाजूने 40 आमदार आहेत, असं अजित पवार म्हणाले. यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. पक्ष संघटनेच्या आधारावर नाही तर फक्त आमदारांची संख्या बघून निवडणूक आयोगाने निकाल दिला का? असा प्रश्न पत्रकारानी विचारला. त्यावर अजित पवारांनी आपल्याकडे पक्षाच्या सर्वाधिक जिल्हाध्यक्षांचा पाठिंबा आहे, असं अजित पवार म्हणाले.
“आमच्याकडे बहुसंख्य आमदार आहेत इतकंच नाही. आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सर्वाधिक जिल्हाध्यक्ष आहेत. बहुतेक जिल्हाध्यक्ष आमच्यासोबत आहेत कारण आमची भूमिका बरोबर होती. लोकशाहीत बहुमताला प्राधान्य असतं. पक्ष संघटनेतील बहुसंख्य सदस्य आमच्याबरोबर आहेत”, असं अजित पवार म्हणाले.
“कुठल्याही पक्षात घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्यासाठी एक पद्धत आणि परंपरा आहे. त्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो. त्यामध्ये आम्ही आमचं म्हणणं मांडलं आणि इतरांनी त्यांचं म्हणणं मांडलं. अनेक तारखा पडल्या. सगळ्याचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर साहजिकच लोकशाहीत बहुमताला प्राधान्य दिलं जात. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ, पक्षाचा झेंडा या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांनी जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाच्या बाजूने निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. मी या निकालाचं स्वागत करतो. मान्य करतो. आम्ही निवडणूक आयोगाचे आभार मानतो. हेच मला या निमित्ताने सांगायचं आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रता प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. या प्रकरणावरही लवकरात लवकर निकाल जाहीर होईल, अशी मी आशा व्यक्त करतो”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. “कुणाला काय म्हणायचं त्यावर आम्हाला टीका टीप्पणी करायची नाही. काम करणं, केंद्राच्या जास्तीत जास्त योजना महाराष्ट्रात आणणं, प्रयत्नशील राहणं एवढंच आमचं काम आहे. मी कुणाच्याही आरोपांना उत्तर द्यायला बांधील नाही”, असंही ते यावेळी म्हणाले.
“कुणाला कुठे जायचं असेल. संविधानाने न्याय मागण्याचा अधिकार आहे. आमच्या विरोधात निकाल गेला असता तर आम्ही देखील सुप्रीम कोर्टात गेलो असतो. ठीक आहे, आम्हीसुद्धा सुप्रीम कोर्टात भूमिका मांडू”, असं अजित पवार म्हणाले. “जयंत पाटील यांना जे काही म्हणायचं आहे तो त्यांचा अधिकार आहे”, असं अजित पवार म्हणाले. “आम्ही बेरजेचं राजकारण करु, जे लोकं आमच्यासोबत येतील त्यांना सोबत घेऊ. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या मार्गाने आम्ही पुढे जाऊ”, अशी देखील प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.