आनंद पांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना आज लातूरहून मुंबईत आणण्यात आलंय. आता त्यांच्यावर पुढील उपचार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात होईल. धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांची रुग्णालयात जावून भेट घेतली. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“डॉक्टरांनी पूर्णपणे तपासणी केलेली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांच्या सात आणि आठ नंबरच्या बरगड्यांना थोडसं फ्रँक्चर झालंय. तरीदेखील आपण 24 तास लक्ष देऊ. त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
“धनंजय मुंडे यांना किती दिवस ठेवायचं हे आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत सांगतो असं डॉक्टरांनी सांगितलंय. पण आता त्यांची तब्येत व्यवस्थित आहे. काळजीचं कारण नाही. पण विश्रांतीची गरज आहे”, असं अजित पवार म्हणाले.
ब्रीच कँडी रुग्णालयाचे सीनियर डॉक्टर प्रतीत समदानी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धनंजय यांना उपचारासाठी काही दिवस रुग्णालयात थांबावं लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिलीय.
“धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत”, असं डॉक्टर प्रतीत समदानी म्हणाले.
“धनंजय यांना थोडाफार मार लागला आहे. त्यांची तपासणी करुन आम्ही योग्य माहिती देऊ”, अशी प्रतिक्रिया डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली.
“या अपघातामुळे रिब फ्रँक्चरची शक्यता आहे. आम्ही टेस्ट करुन कन्फर्म करु”, असंही त्यांनी सांगितलं.
“धनंजय मुंडे यांना उपचारासाठी काही दिवस थांबावं लागेल”, असं डॉक्टरांनी यावेळी सांगितलं.