मुंबई : देशात आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकीच्या धुराळा उडणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या जागांवर भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून वज्रमूठ घट्ट करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तर महाविकास आघाडी एकत्र लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे याबाबत आपण स्टॅम्प पेपरवरही लिहून द्यायला तयार आहोत, असं अजित पवार पत्रकार परिषदेत स्पष्टपणे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीत नेमकी खलबतं काय सुरु आहेत, याबाबत मविआतील आतली बातमी सांगितली आहे.
महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपावर अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जिंकलेल्या जागा आमच्याकडेच राहाव्यात, अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. जिंकलेल्या 25 जागा सोडून महाविकास आघाडीत चर्चा होणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडीत लोकसभेसाठी 16-16-16 असा फॉर्म्युला ठरलेला नाही, असंही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
“मी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो होतो. त्यावेळेस उद्धव ठाकरे म्हणाले होते की, आम्ही गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकल्या राहाव्यात, अशी आमची इच्छा आहे. अशी त्यांनी त्यावेळेस व्यक्त केलेली होती. अजून त्याबाबत पुढे कोणतीही चर्चा झालेली नव्हती. तीनही पक्षांचे लोकं नेमले जाणार आहेत आणि मग चर्चा सुरु होणार आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
“चर्चा सुरु असताना साधारण चर्चेला कुठेही अडथळा येऊ नये, म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे आताचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या जागा बाजूला ठेवून 25 जागांची चर्चा करावी. 25 जागांमध्ये चर्चा करायला काही अडचण नाही. कारण त्या जागा आमच्या तीनही पक्षांकडे नाहीय”, असं अजित पवारांनी सांगितलं.
यावेळी एका पत्रकाराने आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र राहील का? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. “महाविकास आघाडी पुढच्या काळात 100 टक्के एकत्र राहणार आहे. तू स्टॅम्प आण. मी तुला त्यावर लिहून देतो. मी, उद्धव ठाकरे, नाना पटोले आम्ही सह्या करुन देतो”, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीत मतभेद असल्याच्या चर्चांबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “अशा प्रकारच्या चर्चा चालतात. एक पक्ष असला तरी त्या पक्षामधील वेगवेगळ्या नेत्यांचे विचार येतात. शेवटी त्याबाबत अंतिम निर्णय त्या पक्षाचे सर्वोच्च नेते घेतील”, असं अजित पवार यांनी म्हटलं.