Ajit Pawar Net Worth: महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार सहाव्यांदा शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्यासोबत एकनाथ शिंदेसुद्धा उपमुख्यमंत्री होणार आहे. सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे. अजित पवार यांची नेटवर्थ 124 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे कोट्यवधींची घर आणि जमीन आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे संपत्तीची माहिती देणारे शपथपत्र दाखल केले होते. मायनेता डॉट कॉम या वेबसाईटने अजित पवार यांच्या शपथपत्राच्या आधारावर संपत्तीची माहिती दिली. अजित पवार यांच्याकडे 124 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्यांच्यावर 21.39 कोटी रुपये कर्ज आहे. 12वी उत्तीर्ण असलेले अजित पवार हे महाराष्ट्रातील श्रीमंत नेत्यांच्या यादीत आहेत.
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, अजित पवार यांच्या कुटुंबाकडे एकूण 14.12 लाख रुपये रोख असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर विविध बँकांच्या खात्यांमध्ये 6.81 कोटींहून अधिक रक्कम जमा आहे. त्यांचे बँकेत तीन कोटींचे डिपॉझीट आहे. तसेच त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावरसुद्धा तीन कोटी रुपये डिपॉझीट आहेत. तसेच एनएसएस, पोस्टाच्या बचत योजनेत 1.52 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. परंतु अजित पवार किंवा परिवाराकडे कोणतीही लाइफ इंश्योरेन्स पॉलिसी नाही.
अजित पवार यांनीही शेअर्स, बॉण्ड्समध्ये खूप पैसा गुंतवला आहे. एकीकडे त्यांनी 24 लाख रुपयांची गुंतवणूक केली असताना, त्यांच्या पत्नी आणि मुलांनी अनुक्रमे 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच अजित पवार यांच्याकडे 38 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत. त्यांच्या पत्नीकडे 1.19 कोटींहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत.
अजित पवार यांच्या मालकीच्या वाहनांमध्ये 3 ट्रेलर, टोयोटा कॅमरी, होंडा सीआरव्ही आणि ट्रॅक्टर आहेत. या सर्वांची किंमत सुमारे 75 लाख रुपये आहे. तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे दहा लाखांची वाहने आहेत. अजित पवार यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे सुमारे 13.21 कोटी रुपयांची शेतजमीन आहे. याशिवाय 37 कोटी रुपयांच्या अकृषिक जमिनीची नोंद आहे.