नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : शिंदे गट आणि भाजपच्या महायुतीत आता अजित पवार गट सामील झाला आहे. अजितदादा यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं असून त्यांच्या सहकाऱ्यांनाही मंत्रिपदे देण्यात आली आहेत. तसेच येत्या काळात अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अजितदादा गटाकडून वरचेवर तसे संकेत दिले जात आहेत. तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी राहणार असल्याचं ठासून सांगितलं जात आहे. त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्री होणार की नाही? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. त्यावर आता स्वराज्य पक्षाचे नेते आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मोठं विधान केलं आहे. संभाजीराजे यांनी आतली बातमीच सांगून टाकल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
स्वराज्य पक्षाचा काल मुंबईत जंगी मेळावा पार पडला. यावेळी संभाजीराजे यांनी दणदणीत आणि खणखणीत भाषण केलं. या भाषणातून त्यांनी अजितदादा पवार यांच्याबाबतची मोठी भविष्यवाणीच केली. मला मोठा प्रश्न पडलाय हे तिघे लढणार कसे? आम्हाला बरं आहे, त्यातली आमच्याकडं येतील. हे सगळं गणित लोकसभेसाठी आहे. सगळं झालं की हे सगळे मोठ्या काकाकडे जाणार. मी त्यांच्यावर बोलणार नाही. कारण ते माझे संस्कर आहेत, असं संभाजीराजे म्हणाले.
अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. सगळं ठरलेलं आहे, असं सांगतानाच हिंदुत्वाची युती आणि राजकीय युती हे काय असते? यातील फरक शोधण्यासाठी मला डिक्शनरी घ्यायची आहे, असा टोलाही त्यांनी सत्ताधााऱ्यांना लगावला.
सत्ता मिळवणम्यासाठी सर्वांना फोडायचं आणि मजा घ्यायची. हेच राज्यात सुरू आहे. पण स्वराज्य पक्ष कुणाला फसवणार नाही. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आलो आहोत. लोकांना फसवण्यासाठी नाही. ते आमच्या रक्तात नाही, असंही त्यांनी ठासून सांगितलं.
येत्या 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत टाळ्या वाजवून चालणार नाही. पैसे घेऊन चालणार नाही. आपल्याला वेगळं काही करायचं आहे. आपला भारत महान आहे. महाराष्ट्र वेगळा आहे. आपण काय करू शकतो हे दाखवणार की नाही? असा सवाल करतानाच मी कुणावर टीका करत नाही. पण टीका करायला भाग पाडू नका. आम्हला डिवचू नका. आम्ही खानदानी आहोत. आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, असा इशाराच त्यांनी दिला.