मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि अजितदादा गटात सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे. पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. ऐन महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आल्याने राष्ट्रवादीचं पुण्यातील बळ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी सामील झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मात्र, तरीही पालकमंत्री ठरत नव्हते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जुन्याच पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. शिंदे सरकारमध्ये पुण्याचं पालकमंत्रीपद भाजपने स्वत:कडे ठेवलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आली होती. मात्र, अजित पवार हे पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होते. आपल्याला पालकमंत्रीपद द्यावं, असं त्यांचं म्हणणं होतं.
पुण्यात राष्ट्रवादीचं बळ आहे. पुणे महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे महापालिका राखली जावी म्हणून अजित पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे विधानसभेच्या निवडणुकीतही पक्षाला चांगलं यश यावं म्हणून अजित पवार यांनी पुण्याचं पालकमंत्रीपद आपल्याला देण्याची मागणी केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली आहे. या नव्या निर्णयानुसार आता अजितदादा गटाकडील पालकमंत्रीपदांची संख्या सात झाली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचं पालकमंत्रीपद काढून ते अजितदादांकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद जाईल असं वाटत होतं. चंद्रकांतदादा कोल्हापूरचे असल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी जाईल अशी चर्चा होती. मात्र चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार