‘बाळासाहेब ठाकरे यांचाच आदेश एकनाथ शिंदे यांनी पाळला नाही’, अजित पवार यांचं वर्मावर बोट

| Updated on: Feb 08, 2023 | 9:30 PM

‘टीव्ही 9 मराठी’चे मुख्य संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली.

बाळासाहेब ठाकरे यांचाच आदेश एकनाथ शिंदे यांनी पाळला नाही, अजित पवार यांचं वर्मावर बोट
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मुख्य संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी या विषयावर आपली रोखठोक भूमिका मांडली. “शिवसेनेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट जो निकाल देतील तोच निकाल सगळीकडे लागू होईल. तशा पद्धतीनेच निकाल लागेल. बहुमत असताना कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचं सरकार जातं. अशाप्रकारचं तोडाफोडीचं राजकारण याआधी देशात झालेलं आपण पाहिलेलं नाही. याशिवाय लोकांनाही अशा निवडणुका आवडत नाही. याआधी असं वागणाऱ्या नेत्यांना जनतेने नाकारलं आहे”, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी यावेळी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. “बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्तित्वाकरता शिवसेनेची स्थापना केली होती. विशेषत: मुंबई डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी शिवसेना काढली होती. त्यांनी ते चिन्ह मिळवलं होतं. त्यांनी पक्ष सर्वदूर पोहोचवला आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“बाळासाहेब ठाकरे यांनी उतारवयात महाराष्ट्राला सांगितलं की माझ्यानंतर उद्धव ठाकरे पक्ष चालवतील, असं सांगितलं. त्यावेळेस सर्वांनी शिवाजी पार्कच्या मैदानात टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला होता”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हे सुद्धा वाचा

“ज्या पक्षाच्या प्रमुखांनी पक्ष काढला. तो पक्ष काढल्यानंतर काही पानपट्टी चालवणारे आमदार झाले. काही खासदार झाले. काही गाड्या चालवणारे ड्रायव्हर आमदार झाले. हा बाळासाहेबांचा करिश्मा आहे”, असं पवार म्हणाले.

‘…म्हणून पक्षांतर्गत बंदी कायदा’

“आपल्या देशात, वेगवेगळ्या राज्यात स्थितरता यावी म्हणून पक्षांतर्गत बंदी कायदा केला. नाहीतर घोडेबजार सारखंच होईल. जर काही खासदार फुटून देशाचं सरकार बदलत असेल तर देशाचं बजेट किती असतं ते आपल्याला माहिती आहे. तसंच राज्याच झालं तर स्थिरता राहणार नाही. स्थिरता राहिली नाही तर काम करताना प्रशासनाला चालढकल करावी लागते. त्याचा दुष्परिणाम त्या राज्यावर होते”, असं अजित पवार म्हणाले.

‘चिन्हाचा काही प्रश्न येणार नाही’

“शिवसेनेच्या बाबतीत चिन्हाचा काही प्रश्न येईल असं मला वाटत नाही. अलिकडे ज्या यंत्रणा निवडणूक तोंडावर असताना वापरल्या जातात त्यामुळे प्रचंड वेगाने ते चिन्ह लोकांपर्यंत पोहोचतं. काही वेळ लागत नाही”, असा दावा अजित पवारांनी केला.

“पूर्वीचा काळ वेगळा होता. आता तो काळ राहिलेला नाही. आता कोणत्या देशात भूकंप झाला तेव्हा तिथे जेव्हा कळतं तेव्हाच इथेदेखील कळतं”, असं अजित पवार म्हणाले.

“आम्ही पक्षाच्या बाहेर पडल्यानंतर आधी चरखा मागितला होता. निवडणूक आयोगाने चरखा दिला नाही. नंतर आम्हाला घड्याळ दिलं. ते सर्वदूर नेण्याचं काम झालं”, अशी आठवण अजित पवारांनी सांगितली.