राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवत भूमिका मांडली आहे. असं असलं तरीदेखील अजित पवार यांनी नवाब मलिक यांना मानकूर येथून तर त्यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर येथून उमेदवारी जाहीर केली. अजित पवार यांनी नवाब मलिक यांना विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी भूमिका स्पष्ट केली होती. भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली होती. यानंतर भाजपचा विरोध झुगारत अजित पवार हे आज अणुशक्तीनगर येथे गेले. अजित पवार यांनी भाजपच्या विरोधाला केराची टोपली दाखवत नवाब मलिक यांचा प्रचार केला. त्यामुळे महायुती म्हणून अजित पवार आणि भाजपला जनतेला नेमका काय संदेश द्यायचा आहे? असा प्रश्न आता निर्माण होतोय.
अजित पवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या प्रचारासाठी आज अणुशक्तीनगर येथे दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली. अनेकांनी अजित पवार यांच्या गळ्यात पुष्पहार घालत स्वागत केलं. अनेकांनी अजित पवार यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. तर अनेकांनी घोषणाबाजी करत अजित पवारांचं स्वागत केलं. यावेळी एकाच गाडीत अजित पवार, नवाब मलिक आणि सना मलिक प्रचार करताना बघायला मिळाले. अजित पवार यांची मोठी रॅली यावेळी काढण्यात आली. यावेळी अजित पवार आणि नवाब मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला देखील प्रतिक्रिया दिली.
“अजित पवार माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांना माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी मला उमेदवारी दिली. ते माझ्या प्रचारासाठी आले. यापेक्षा जास्त काही होऊ शकत नाही”, असं नवाब मलिक म्हणाले. “अजित दादांच्या स्वागतासाठी सर्व लोक जमले आहेत. अजित दादांनी ज्या हिंमतीने मला उमेदवारी दिली त्या हिंमतीला दाद देण्यासाठी लोक जमले आहेत”, अशीदेखील प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.
अजित पवार यांना यावेळी प्रश्न विचारला असता, “मी माझी जबाबदारी पार पाडत असतो”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. यावेळी अजित पवार यांना भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही, तशी भूमिका मांडली आहे. त्यावर तुम्ही काय सांगाल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आम्ही प्रचार करतोय ना?”, असं म्हटलं.
“मतदार त्याबाबतचा निर्णय घेतील. आमदार अबू आझमी तीन टर्मपासून इथे आहेत. ते काम करत असताना जो विकास व्हायला हवा होता तो होऊ शकला नाही. इथे खूप अडचणी आहेत. इथे लोकं खूप आजारी पडतात. त्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यका आहे. नवाब मलिक यांना इथलं प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर आम्ही सर्व अडचणी दूर करु”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.