मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या गोटात सध्या जोरदार हालचाली सुरु आहेत. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षावर किंवा पक्षातील कोणत्याही नेत्यावर टीका केलेली नाही. त्यांच्या या कृतीचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केलं आहे. तसेच त्यांनी आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “इतकी वर्ष एकाच पक्षात राहिलेली व्यक्ती सहजासहज पक्ष सोडत नाही, काहीतरी गडबड असेल”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “अशोक चव्हाण यांच्याबद्दल आम्ही गेली अनेक दिवस ऐकत होतो. या चर्चेला आज मुहूर्तरुप मिळाले. इतकी वर्ष एका पक्षात राहिलेला व्यक्ती असा सहजासहजी पक्ष सोडत नाही. पक्षात काहीतरी गडबड असल्यावरच असा निर्णय नेते घेतात. मात्र त्यांनी पक्षातल्या गोष्टींवर बोलणे टाळत प्रगल्भतेचं दर्शन दिले”, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी आगामी राज्यसभेच्या जागावाटपावर प्रतिक्रिया दिली. “आमचे अजून काही ठरलेलं नाही. आमच्यासमोर दहा ते बारा नावे आहेत. त्यावर आज चर्चा करुन फायनल करु”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षक, गुरु, मार्गदर्शक हे राजमाता जिजाऊच आहेत. ही माझी आणि पक्षाची भूमिका आहे”, असं अजित पवार म्हणाले.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या अनेक दिवसांपासून कानावर येत होतं की काँग्रेसचे मोठे चेहरे पक्ष सोडतील. आमच्या जुन्या सहयोगी पक्षातील आमचे सहकारी आता पुन्हा आमचे सहयोगी होतील. यामुळे निश्चित महायुतीची ताकद वाढायला मदत होईल”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
“मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्षांना भेटून दिला आहे. त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, विधीमंडळ काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आहे. मला कुणाबद्दल तक्रार करायची नाही. माझ्या मनात कुणाहीबद्दल वैयक्तिगत भावना नाही. यापुढची राजकीय दिशा, मी एक-दोन दिवसात निर्णय घेईन. मी अद्याप ठरवलेलं नाही. दोन दिवसात मी माझी राजकीय भूमिका काय असेल ते ठरवेल. भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहिती नाही. मी काँग्रेसमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही”, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.