मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ खासदार संजय राऊत यांनीदेखील मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं विधान काल केलं होतं. विशेष म्हणजे मध्यावधी निवडणुकीसाठी दिल्लीत तयारी सुरु झालीय, असा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या विधानाविषयी आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी मध्यावधी निवडणुका राज्यात होणार नाही, असं स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. राऊतांनी केलेलं विधान कोणत्या आधारावर केलं? याबाबत त्यांना विचारु, असंदेखील अजित पवार यावेळी म्हणाले.
“राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्यासारखी सध्या तरी परिस्थिती दिसत नाही. कारण या सरकारला 145 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. राज्यात कुणाचंही सरकार असलं तरी त्या सरकारच्या पाठिशी 145 आमदारांचा पाठिंबा असतो. त्यामुळे 145 आमदारांचा पाठिंबा असेपर्यंत सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
“संजय राऊत यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देणार. त्यांना वाढदिवसानिमित्त अनेक फोन येणार. त्यामुळे मी त्यांना तेव्हा त्याबद्दल विचारणार नाही. पण नंतर मी जरुर विचारणार”, असं अजित पवारांनी सांगितलं.
मध्यावधी निवडणुकीबाबत विधान करण्यात आलंय. त्या पाठीमागचं नेमकं कारण काय? असा प्रश्न आपण संजय राऊत यांना विचारु, असंही त्यांनी सांगितलं.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
“महाराष्ट्राचं राजकारण खूपच अस्थिर झालंय. ते इतकं की मध्यावधीची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार आहेत”, असं भाकीत संजय राऊत यांनी केलं. त्यांनी रविवारी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं होतं.