मुंबई | 20 ऑगस्ट 2023 : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं. 40 आमदार घेऊन त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. अजितदादा यांच्या या बंडावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी अजितदादांवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांनी ज्या ज्या संस्थांवर पदे दिली. त्या संस्थांमधून अजितदादा यांनी पदमुक्त व्हावे, असं म्हणत संजय राऊत यांनी अजितदादांना डिवचले आहे. त्यावर आता अजितदादा काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोकमधून हे भाष्य केलं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटी राजकीय नाहीत. शरद पवार यांनी अनेक संस्था निर्माण केले आहे. या संस्थांचं जाळं पसरलं आहे. अजित पवार यांना अजितदादांनी या संस्थांमध्ये घेतलं आहे. राज्यातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थांच्या चेअरमनपदी शरद पवार आणि संचालकपदी अजित पवार आहेत.
असे अनेक त्रांगडे अनेक संस्थात आहे. या संस्थांचा वेलू गगनावर नेण्याचं काम शरद पवार यांनी केलं आहे. या वेलूवर जे लटकत आहेत. त्यांनी त्यांची पदे सोडून स्वत:च्या संस्था निर्माण करण्याचं औदार्य दाखवलं पाहिजे, असं सांगतानाच शेवटी हा पवार कुटुंबातील अंतर्गत प्रश्न आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीवरच अजितदादा दावा सांगता आहे. पवारांच्या हयातीतच स्वामित्व सांगितलं गेलं आहे, तिथे या संस्थांच्या हक्कांवर काय बोलायचे? असा सवालही राऊत यांनी रोखठोकमधून केला आहे.
राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार हे चित्र चुकीचं आहे. एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना होऊ शकत नाही. तसेच अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी होऊ शकत नाही, असा दावाही राऊत यांनी केला आहे. ईडीच्या धाकाने अनेकजण भाजपमध्ये गेले आहेत. काही शिंदे यांच्या गटाच्या आश्रयाला गेले आहेत. पण 2024च्या सत्ताबदलानंतर अनेकजण परत फिरतील. मोदी सरकार जात असल्याची झुळूक जरी लागली तरी भाजपचा तंबू रिकामा होईल, असा दावाही राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.
मोदींचे समर्थन करणं म्हणजे प्रतिगामी शक्तींचे समर्थन करण्यासारखे आहे. त्यामुळे जे आज भाजपमध्ये गेले. उद्या त्यांचे हळूहळू राजकारण संपणार आहे. अजित पवारांबरोबर भाजपच्या कळपात जाण्याची चूक शरद पवार करणार नाहीत. पण शेवटी हा व्यक्तीचा विषय आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. राज्यातील नेत्यांना गोलगोल, गोलमाल राजकारण करता येणार नाही. अजित पवार हे काकांच्या जिवावर मोठे झाले आणइ काकांचे राजकारण त्यांनी संकटात आणले. ते गोलमाल राजकारण करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केलीय.
अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. दुसरीकडे भाजप आमदारांना आता एकनाथ शिंदे हे ओझे वाटू लागले आहेत. शिंदे यांच्यामुळे भाजपचं राज्यात मोठं नुकसान झालं आहे, असं भाजप नेते अमित शाह यांना सांगत आहे. शाहही राज्यात बदल करणार असल्याचं सांगत आहे. तर 2024 नंतरही आपणच मुख्यमंत्री राहणार असल्याचं एकनाथ शिंदे सांगत आहेत. अमित शाह यांनी वचन दिल्याचा दावाही शिंदे करत आहेत. पण ते काही खरे नाही. शाह यांना शिंदे यांना दिलेलं वचन पाळायचं होतं तर अजितदादांचा घोडा रिंगणात आलाच नसता. राज्यातील राजकारण हेलकावे खात आहे, त्या अस्थिरतेचा फायदा दिल्लीला घ्यायचा आहे, असा दावाही त्यांनी केला.