मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवारांचे (Ajit Pawar) मोठे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) पुन्हा चर्चेत आहेत. पार्थ पवारांनी शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाईंची (Shambhraj Desai) भेट घेतलीय. मुंबईतल्या देसाईंच्या बंगल्यावर दोघांमध्ये १५ ते २० मिनिटं चर्चा झाली. भेटीचं कारण कळालेलं नाही. खासगी कामानिमित्त भेट झाल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलंय. मात्र याच भेटीनंतर पार्थ पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ असल्याचा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलाय. पडळकर आणि भाजप समर्थकांनी पार्थ पवारांच्या अस्वस्थतेमागे रोहित पवार आणि पार्थ पवारांच्या एका तुलनेचं पोस्टर व्हायरल केलंय. त्या पोस्टरमधल्या घटनाक्रमांद्वारे पार्थ पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. पार्थ पवारांच्या रुपात मावळ लोकसभेत अनेक वर्षात पवार घराण्यातून पहिला व्यक्ती पराभूत झाला. दुसरीकडे रोहित पवार कर्जत-जामखेडमधून पहिल्याच टर्ममध्ये विधानसभेवर पोहोचले. असं म्हणतात की 2019 च्या विधानसभेसाठी सुद्धा पार्थ पवार इच्छूक होते. मात्र त्यांना संधी मिळाली नाही.
दुसरीकडे रोहित पवारांकडे आमदारकीबरोबरच रयत शिक्षण संस्थेचं संचालकपद आलं. बारामती कृषी अॅग्रोचं अध्यक्षपद रोहित पवारांकडेच आहे. शिवाय नुकतंच रोहित पवार MCA अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्षही बनलेयत.
सध्या पार्थ पवारांकडे पक्ष संघटनेची कोणतीही जबाबदारी नाहीय. पक्षाच्या कार्यक्रमांनाही ते फार दिसत नाहीत. याउलट शरद पवारांसोबत अनेक कार्यक्रमात रोहित पवारांची हजेरी असते.
मविआ सरकार असताना पार्थ पवारांची एक भेट वादात ठरली होती. अभिनेता सुशांतसिंगच्या मृत्यूवरुन भाजपनं मविआविरोधात रान उठवलं होतं. सुशांतसिंगची हत्या झाल्याचा दावा करत भाजप नेते चौकशीची मागणी करत होते, त्याचवेळी पार्थ पवारांनी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्या भेटीत सुशांतसिंगच्या चाहत्यांच्या मागणीनुसार त्याच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती.
पार्थ पवारांच्या या भेटीवर जेव्हा शरद पवारांना विचारणा झाली, तेव्हा पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
अजित पवारांना पार्थ पवार आणि जय पवार अशी दोन मुलं आहेत. पार्थ पवारनं 2019 च्या लोकसभेपासून राजकीय कारकिर्द सुरु केलीय. जय पवार अद्याप राजकारणात सक्रीय नाहीत.
दुसरीकडे अजित पवारांचे पुतणे आणि त्यांचे मोठे चुलत बंधू राजेंद्र पवारांचे पुत्र रोहित पवारांनी सुद्धा 2019 च्या विधानसभेपासून राजकारणाची सुरुवात केली. पार्थ पवारांचं वय ३२ आहे. तर रोहित पवारांचं वय ३७. राजकारणात येण्याआधीपासून रोहित पवारांची ओळख उद्योजक म्हणूनही राहिलीय.
अलीकडच्या काही कार्यक्रमांना पवार कुटुंब एकत्र आलं. त्यावेळी मात्र कुटुंब म्हणून त्यांच्यात खेळी-मेळीच्या गप्पा रंगल्या होत्या. लोकसभेतल्या पराभवापासून भाजप वारंवार पार्थ पवारांच्या कथित अस्वस्थतेवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बोट ठेवत आलीय. पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी मात्र त्याला नकार देते.