Ajit Pawar | अजित पवार यांचा ‘देवगिरी’ बंगला ठरला घडामोडींचा केंद्रबिंदू, पडद्यामागे काय-काय घडलं?

| Updated on: Jul 02, 2023 | 7:23 PM

राज्यात आज जो राजकीय भूकंप घडलाय त्याचं मुख्य केंद्र अजित पवार यांचा 'देवगिरी' बंगला आहे. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यात आज भरपूर खलबतं झाली. यावेळी स्वत: सुप्रिया सुळे देखील हजर होत्या. त्यानंतरही राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडल्याचं चित्र आहे. देवगिरी बंगल्यापासून सुरु झालेल्या घडामोडी राजभवनापर्यंत कशा येऊन ठेपल्या? याची थोडक्यात माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Ajit Pawar | अजित पवार यांचा देवगिरी बंगला ठरला घडामोडींचा केंद्रबिंदू, पडद्यामागे काय-काय घडलं?
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप बघायला मिळाला आहे. पण हा राजकीय भूकंप घडण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवास्थानी अनेक तास खलबतं झाली. अजित पवार यांच्या घरी ज्या घडामोडी घडल्याच त्याच महत्त्वाच्या ठरल्या आहेत. बराच वेळ इथे खलबतं झाली. अनेक आमदार या बैठकीत सहभागी झालेले. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बैठकीत सहभागी झाले होते. याशिवाय राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या देखील या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे दिवसभरात घडलेल्या घडामोडींना जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज सकाळपासून धुसफूस असल्याची चर्चा समोर आली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यासाठी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर खलबतं सुरु असल्याची चर्चा समोर आली होती. पण दुपारी वेगळीच बातमी समोर आली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या सगळ्यांशी सबंधित घडामोडी अजित पवार यांच्या निवासस्थानीच घडल्या.

अजित पवार यांच्या निवासस्थानी सकाळपासून काय-काय घडलं?

अजित पवार यांच्या घरी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. आमदार किरण लहामाटे, दौलत दरोडा सर्वात आधी अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी आले. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे सकाळी नऊ वाजता अजित पावर यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवास्थानी आले. त्यानंतर साडेनऊ वाजता आमदार हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांच्या बंगल्यावर आले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे सकाळी दहा वाजता अजित पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाल्या. त्यानंतर लगेच दहा मनिटांनी प्रफुल्ल पटेल अजित पवार यांच्या घरी आले.

हे सुद्धा वाचा

या सगळ्या घडामोडींदरम्यान सकाळी 11 वाजता अजित पवार यांची समर्थक आमदारांसोबत बैठक झाली. सकाळी सव्वा अकरा वाजता बैठक सुरु झाल्यानंतर छगन भुजबळ आणि काही आमदार देवगिरी बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर दुपारी 12 वाजता सुप्रिया सुळे देवगिरी निवासस्थानावरील बैठकीतून बाहेर निघाल्या. पण त्यानंतर पुन्हा दुपारी साडेबारा वाजता सुप्रिया सुळे अजित पवारांच्या बैठकीत दाखल झाल्या. त्यानंतर दुपारी दीड वाजता अजित पवार सत्तेत सामील होणार ही बातमी समोर आली.

…आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

दुपारी दीड वाजता अजित पवार, छगन भुजबळ यांचे पीए राजभवनावर दाखल झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस त्यांच्या सागर बंगल्यावरुन राजभवनाकडे रवाना झाले. दुपारी 1 वाजून 33 मिनिटांनी अजित पवार, छगन भुजबळ समर्थक आमदारांसह राजभवनावर दाखल झाले. त्यानंतर १ वाजून ४० मिनिटांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर आमदार राजभवानावर दाखल होण्यास सुरुवात झाली.

दुपारी १ वाजून ४२ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस राजभवानावर पोहोचले. शपथविधीच्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली. त्यानंतर 1 वाजून 50 मिनिटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवानावर दाखल झाले. दुपारी अडीच वाजता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.