अमरदीप वाघमारे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा महाभूकंप होण्याची शक्यता वर्तवणारी बातमी आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाणार आहेत. हा दावा सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने केला नाही. किंवा विरोधकांच्या तंबूत खळबळ उडवण्यासाठी केलेलाही हा दावा नाही. तर हा दावा केला आहे. राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा दावा केला आहे. या ट्विटमधून त्यांनी एक प्रकारे भाजपचा पुढचा प्लॅनच सांगितला आहे. दमानिया यांच्या या ट्विटने एकच खळबळ उडाली आहे. तसेच त्यांचं ट्विट जोरदार व्हायरल होत आहे.
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच. बघू…..आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आधी अजित पवार गेल्या आठवड्यात नॉट रिचेबल झाले होते. त्यावेळीही अंजली दमानिया यांनी फडणवीस आणि अजितदादांच्या शपथविधीचा फोटो पोस्ट केला होता. त्यावर, किळसवाणी राजकारण… मी पुन्हा येईन, अशी सूचक कमेंट केली होती.
आतापर्यंत अनेक पत्रकारांशी मी बोलत होते. त्यावेळी अजित पवार यांच्या सॉफ्ट स्टँडबाबत चर्चा व्हायची. आज जर तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाचं कव्हरपेज पाहिलं तर त्यात ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्याच्या चौकशीतून अजित पवार यांचं नाव वगळलं आहे. अशा बातम्यांमधून संकेत मिळत असतात. मी आठ ते 10 पत्रकारांशी बोलले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते भाजपला सॉफ्ट आहेत. ते विरोधी पक्ष नेते म्हणून आक्रमक नाही. ते भाजपला पुरक भूमिका घेतात. असंही सांगितलं जातंय की 23 जणांच्या सह्या झाल्या आहेत. याला काय म्हणायचं? या सर्व संकेतामुळे मी ट्विट केलं, असं दमानिया यांनी सांगितलं.
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच
बघू…..
आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 11, 2023
सध्या घाणेरडं राजकारण सुरू आहे. मी बातम्यांचे धागेदोरे जोडून माझा अंदाज व्यक्त केला. मला एका व्यक्तीने सांगितलं 16 आमदार बाद होणार आहे. भाजपला बॅकअप हवा आहे. त्यामुळे अजितदादा त्यांना पुरक ठरू शकतात. त्यामुळे मी हे ट्विट केलं, असं त्यांनी स्पष्ट केलं.