मुंबई | 3 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत चर्चांना उधाण आलंय. अजित पवार नाराज आहेत, अशा चर्चा सध्या सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांदरम्यान अजित पवार आज राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत उपस्थित राहिले नाहीत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील अनुपस्थितीबाबत प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांची तब्येत बरी नसल्याने ते आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पण त्यानंतरही काही घडामोडी घडल्या आहेत. याशिवाय आगामी काळातही काही घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षांमध्ये सारं काही आलबेल आहे ना? असा प्रश्न निर्माण झालाय.
अजित पवार आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजर राहिले नाहीत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले. सत्तेत तीन पक्ष आहेत. या पक्षात अजित पवार यांचाही भलामोठा गट आहे. तरीही शिंदे-फडणवीस यांच्यासोबत अजित पवार दिल्लीला गेले नाहीत. शिंदे-फडणवीस यांची दिल्लीत वरिष्ठांशी महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठक होणार आहे. या बैठकीला देखील अजित पवार गैरहजर राहणार आहेत.
विशेष म्हणजे अजित पवार आजारी असतील तर त्यांच्या पक्षाकडून प्रफुल्ल पटेल किंवा इतर दिग्गज नेते दिल्ली जाणं अपेक्षित होते. पण तेदेखील दिल्लीला गेले नाहीत. याउलट अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी त्यांच्या पक्षाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक सुरु आहे. त्यामुळे पडद्यामागे नेमक्या काय हालचाली सुरु आहेत? याबाबत चर्चांना उधाण आलंय.
अजित पवार यांची आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजेरी, नंतर शिंदे-फडणवीस दोनचे नेते दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर आता अजित पवार आणखी एका बैठकीसाठी दिल्लीला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार जीएसटी कौन्सिल बैठकीसाठी दिल्लीला जाणार होते. पण ते आता या बैठकीला जाणार नाहीत. ही बैठक येत्या 7 ऑक्टोबरला नियोजित आहे. पण त्यांच्याऐवजी आता मंत्री दीपक केसरकर या बैठकीला जाणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार हे जीएसटी कौन्सिल बैठकीसाठी दिल्लीला जाणार नाहीत. याउलट त्या दिवशी ते दिल्ली ऐवजी नाशिक येथे नियोजित कार्यक्रमाला अजित पवार आहेत. अजित पवार यांनी आजचा दिल्ली दौरा टाळल्यानंतर ते आगामी दिल्ली दौराही टाळणार असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.