शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज शिवतिर्थावर पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्राची ओळख सांगणारी ही लढाई आहे. महाराष्ट्राचं जे वर्णन आहे. मंगल देशा पवित्र देशा राकट देशा कोमल देशा, फुलांच्या देशा… दळभद्र्यांच्या देशा नाही. बुद्धीच्या देशा. हे वर्णन कायम ठेवायचं आहे. लाचार आणि गद्दारांच्या देशा असं करायचं नाही. आता असं कळलंय की ७० हजार कोटींचा घोटाळा करणारेही लाजून बाहेर पडणार आहेत. त्यांना पण लाज वाटू लागली आहे. असं ऐकलंय. यांचा घोटाळा मोठा आहे. माझा तर काहीच नाही असं त्यांना वाटतंय. असं मी ऐकलंय. अशी बातमी आहे. जीवात जीव असे पर्यंत महाराष्ट्र लुटू देणार नाही. मी काही झालं तरी हा महाराष्ट्र भाजपच्या हाती जाऊ देणार नाही. फुले, आंबेडकर, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र मोदी शाह यांच्या हाती जाऊ देणार नाही.
उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि शाहांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाली की, मी एक स्वाभिमानी महाराष्ट्र प्रेमी म्हणून शपथ घेतो की, १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र मी लुटारू आणि दरो़डोखोरांच्या हाती जाऊ देणार नाही. मी शपथ घेतो की, छत्रपती शिवराय आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट उभी केली. ती मी अभेद्य ठेवेन. मी शपथ घेतो की महाराष्ट्रात अंधकार घडवणाऱ्या दिल्लीतील शहांना रोखण्यासाठी मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मशाल बनून लढत राहील. मी शपथ घेतो की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत शिवशाही महाराष्ट्रात आणण्यासाठी हीच मशाल धगधगत ठेवेन.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, धारावीच्या माध्यमातून मुंबईला लुटायचे आहे. हे मी होऊ देणार नाही. सत्तेत आल्यावर आधी हे टेन्डर मी रद्द करेल. रोज माझा महाराष्ट्र लुटला जात आहे. संपूर्ण राज्याची तिजोरी खाली केली. महापालिकेची तिजोरी खाली केली. ही निवडणूक फक्त उद्धव ठाकरे यांची नाहीये. चंद्रचूड साहेब अजूनही वेळ गेलेली नाही. लोकशाही वाचवा. तारखे मागे तारखी देऊ नका. भाषणाने निर्णय मिळत नसतो. संपूर्ण देशातील लोकशाही तुमच्याकडे बघते. न्यायदेवतेला अभिमान वाटेल असं काम करा. जगातील पहिली अशी केस आहे जे तीन न्यायाधीश न्याय देऊ शकलेले नाही. दार ठोकून ठोकून हात दुखायला लागले पण न्याय मिळत नाही.