मुंबई: मुंबई पोलीस दलातील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या पोलीस कोठडीत 7 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मिठी नदीतून मिळालेला सीसीटीव्ही डेटा आणि वाझेंच्या पासपोर्टची चौकशी करायची असल्याने वाझेंची कोठडी वाढवून देण्याची मागणी एनआयएने विशेष कोर्टात केली होती. त्यामुळे कोर्टाने वाझेंच्या कोठडीत वाढ केली आहे. (Ambani case: Sachin Vaze’s NIA custody extended till April 7)
सचिन वाझे यांची कोठडी आज संपल्याने त्यांना एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी वाझेंचे वकील आणि एनआयएच्या वकिलांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. यावेळी कोर्टाने एनआयएच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आणि प्रकरणाचं गांभीर्य पाहून वाझेंच्या कोठडीत पाच दिवसाने वाढ केली आहे.
वाझेंच्या वकिलांचा युक्तीवाद
सचिन वाझे हे गेल्या 23 दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत. त्यांना आणखी काही काळ कोठडीत ठेवणे अन्यायकारक होईल, असे वाझेंच्या वकिलांनी सांगितले. तर एनआयएचे वकील अनिल सिंग यांनी हा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून आणखी काही गोष्टींच्या चौकशीसाठी सचिन वाझे यांची कोठडी महत्त्वाची असल्याचे सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजमधून सर्व स्पष्ट होईल
आतापर्यंत एनआयए सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे सचिन वाझे यांना कोंडीत पकडू पाहत होती. मात्र, आता वाझे यांनीदेखील सीसीटीव्ही फुटेज सर्व गोष्टी स्पष्ट करेल, असा उलट दावा केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचा तब्बल 120 टीबी डेटा एनआयएकडे आहे. या फुटेजमध्ये कोणीही छेडछाड करु शकत नाही, असं वाझेंनी कोर्टाला सांगितलं.
कसलीच कबुली दिली नाही
वाझेंनी बरेच आरोप कबुल केल्याचं एनआयएने गेल्या सुनावणीवेळी सांगितलं होतं. मात्र, आज वाझेंनी आपण कोणतीच कबुली दिली नसल्याचं सांगत एनआयएला कोर्टात तोंडघशी पाडलं आहे. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणतीही कबुली दिलेली नाही. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनचा आरोपही माझ्यावरच लावण्यात आला, असंही वाझेंनी कोर्टाला सांगितलं.
वाझेंना कोर्टाला द्यायचंय लेखी निवेदन
वाझेंना न्यायालयात लेखी माहिती द्यायची आहे. तुमच्या उपस्थितीत वाझेंना निवेदन लिहून द्यायचे आहे, असं वाझेंच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं. त्यावर तुमच्या अशिलाला जे काही सांगायचे आहे, म्हणायचे आहे. ते त्यांनी कोर्टाच्या नियमानुसारच सांगावे. आपले निवेदन लिहून न्यायालयात सादर करावे, असं न्यायाधीशांनी सांगितलं.
कोठडी का हवी?, एनआयएचे वकील म्हणाले…
>> आरोपीच्या अंधेरी येथील डीसीबी बँकेच्या लॉकरकडून कागदपत्रं मिळाली आहेत. लॉकरमध्ये सापडलेल्या वस्तूंची चौकशी, होणे गरजेचे आहे.
>> सीसीटीव्ही डेटाचा 120 टीबी डेटा आढळला. ज्याची चौकशी होणे आवश्यक आहे. आयपी adrss पडताळणी आवश्यक आहे.
>> जप्त केलेल्या कारची नंबर प्लेट तपासायची आहे. आतापर्यंत 7 मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत, शेवटची कार 2 एप्रिल रोजी जप्त करण्यात आली होती.
>> आरोपींचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असून त्याची तपासणी करावी लागेल.
>> मिठी नदीत शोध घेताना अनेक प्रकारच्या वस्तू सापडल्या आहेत. त्यांची तपासणी करून पुष्टी करायची आहे.
>> याप्रकरणात आतापर्यंत 50 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. (Ambani case: Sachin Vaze’s NIA custody extended till April 7)
आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास
दरम्यान, आज सचिन वाझे यांची सुनावणी होती. यावेळी त्यांचे बंधू सुधर्मही उपस्थित होते. यावेळी वाझे आणि त्यांच्या भावाची काही मिनिटांसाठी भेट झाली. त्यानंतर सुधर्म यांनी आमचा एनआयए आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असं सांगितलं. (Ambani case: Sachin Vaze’s NIA custody extended till April 7)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 April 2021https://t.co/x62wzAztBy
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 3, 2021
संबंधित बातम्या:
सचिन वाझेच्या वापरातील अजून एक अलिशान ‘आऊटलँडर’ गाडी ताब्यात
सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; छातीत दुखायला लागल्याने रुग्णालयात नेण्याची वेळ
(Ambani case: Sachin Vaze’s NIA custody extended till April 7)