‘संभाजी महाराजांना धर्मवीर बोलणं म्हणजे….’, अजित पवार यांच्या ‘त्या’ विधानावर पडद्यावरच्या संभाजी महाराजांना काय वाटतं? पाहा EXCLUSIVE प्रतिक्रिया

| Updated on: Jan 03, 2023 | 5:25 PM

अमोल कोल्हे यांनी नुकतंच एक व्हिडीओ शेअर करत अजित पवारांच्या विधानावर आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आणखी विस्तृतपणे आपली भूमिका मांडली.

संभाजी महाराजांना धर्मवीर बोलणं म्हणजे...., अजित पवार यांच्या त्या विधानावर पडद्यावरच्या संभाजी महाराजांना काय वाटतं? पाहा EXCLUSIVE प्रतिक्रिया
Follow us on

गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणता येणार नाही. तर ते स्वराज्य रक्षक होते, असं विधान अजित पवारांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट चांगलाच आक्रमक झालाय. भाजपकडून राज्यभरातील विविध ठिकाणी अजित पवारांच्या या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जातोय. या दरम्यान रूपेरी पडद्यावर छत्रपती संभाजी महाराज साकारणाऱ्या आणि घराघरांत संभाजी महाराजांचं कार्य पोहोचवणारे कलाकार अमोल कोल्हे यांना अजित पवारांच्या विधानावर नेमकं काय वाटतं? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यावेळी अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपली महत्त्वपूर्ण भूमिका मांडली.

अमोल कोल्हे यांनी खरंतर नुकतंच याबाबत एक व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आणखी विस्तृतपणे आपली भूमिका मांडली.

“माझी प्रमाणिक भावना अशी आहे की, धर्मवीर ही संकल्पना छत्रपती संभाजी महाराजांना या बिरुदावली पेक्षाही स्वराज्य रक्षक ही बिरुदावली जास्त योग्य आणि संयुक्तिक ठरते. कारण छत्रपती संभाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व इतकं मोठं आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“अगदी वयाच्या नऊव्या वर्षापासून ते बिलदानापर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, या स्वराज्याचं रक्षण करणं ही सर्वात मोठी कामगिरी संभाजी महाराजांनी सातत्याने केली”, असं कोल्हे म्हणाले.

“छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा केवळ धर्मवीर ही संकल्पना लावली जाते तेव्हा केवळ त्यांच्या बलिदानाशी ती संकल्पना जोडली जाते. त्यामुळे केवळ धर्मवीर संकल्पनेपेक्षा स्वराज्य रक्षक ही संकल्पना जास्त व्यापक आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ही संकल्पना जास्त न्याय देणारी आहे”, अशी भूमिका खासदार अमोल कोल्हे यांनी मांडली.

“छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे फार मोठी प्रेरणा हिंदुस्तानाला दिली. त्यानंतर तब्बल अठरा वर्ष सर्वसामान्य रयत लढली. सरसेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव, छत्रपती राजाराम महाराज असतील, ताराराणी असतील, सगळे लढले, ही लढण्याची प्रेरणा छत्रपती संभाजी महाराजांनी दिली”, असं मत अमोल कोल्हे यांनी मांडलं.