मुंबई | 17 सप्टेंबर 2023 : विघ्नहर्त्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस उरले आहेत. बाप्पाच्या स्वागताची सर्व तयारी झाली आहे. मंडप सजले आहेत. मंडपात वेगवेगळे देखावे तयार करण्यात आले आहेत. काही ठिकाणी तर चांद्रयान आणि सोलर मिशनचेही देखावे करण्यात आले आहेत. काही ठिकाणी तर बाप्पा विराजमानही झाले आहेत. त्यामुळे भक्तांना बाप्पाच्या दर्शनाची आस लागली आहे. यंदा गणेशोत्सवानिमित्ताने राज्यभरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गणेश मंडळांनीही सुरक्षेची सर्व खबरदारी घेतली आहे. त्यासाठी काही नियमावलीही तयार केली आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. अंधेरीचा राजा मंडळानेही एक नियम जारी केला आहे.
अंधेरीचा राजा मंडळाने गणेश भक्तांसाठी एक ड्रेस कोड जारी केला आहे. त्यानुसार यंदा हाफ पँट आणि शॉर्ट स्कर्ट परिधान करून येणाऱ्या भाविकांना अंधेरीच्या राजाचे दर्शन घेता येणार नाही. ड्रेसकोडसाठी मंडपाच्या बाहेर आणि आत एक फलक लावण्यात आला आहे, ज्यावर कोणत्या प्रकारच्या ड्रेसला परवानगी आहे आणि कोणत्या प्रकारच्या ड्रेसला परवानगी नाही याची छायाचित्रेही लावण्यात आली आहेत. त्यामुळे अंधेरीचा राजा पाहायला जाणाऱ्यांना आता ड्रेसकोड पाळूनच जावं लागणार आहे. नाही तर बाप्पाच्या दर्शनाशिवाय त्यांना माघारी परतावं लागणार आहे.
हाफ पँट आणि स्कर्ट परिधान करून येणार्यांसाठी मंडपात लूंगी आणि फूल पँट ठेवण्यात आली आहे. ज्या महिला आणि पुरुष हाफ पँट आणि स्कर्ट घालून येतील त्यांना लूंगी आणि फूल पँट देण्यात येणार आहे. लुंगी किंवा फूल पँट परिधान करून आत गेल्यावरच बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे. मंडळाने हा नियम 15 वर्षांपूर्वी लागू करण्यात आला असून तो दरवर्षी पाळला जातो.
अंधेरीच्या राजाला पाहण्यासाठी बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रितील अनेक सेलिब्रिटी येतात. त्यांनाही हा ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. यावेळी अंधेरीचा राजा मंडळाने अनोखी थीम तयार केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची थीम यावेळी असणार आहे. संपूर्ण मंडपाला रायगड किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे अंधेरीचा राजा पाहण्यासाठी यंदा प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी 55 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी मंडपात आणि परिसरात अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच 8.31 कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे,रुग्णवाहिका, डॉक्टर, नर्स या ठिकाणी असणार आहे. मंडळाने यावेळी नानावटी हॉस्पिटलशी टायप केलं आहे.