उद्धव ठाकरे यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी, प्रचारावर निर्बंध !

| Updated on: Oct 14, 2024 | 10:06 PM

एच, एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली आहे. दरम्यान त्यांची तब्येत ठीक असून उद्या 11 वाजता डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी, प्रचारावर निर्बंध !
Follow us on

उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईतल्या एच, एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना त्रास जाणवू लागला होता. हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यानंतर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आल्या आणि डॉक्टरांनी अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंवर याआधी 2012 मध्ये जुलै आणि नोव्हेंबरमध्ये 2 वेळा अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. आता ही तिसरी अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. मुख्यमंत्री असताना 2021 मध्ये मणक्याचं ऑपरेशनही झालं होतं. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे.

सकाळी, उद्धव ठाकरे सर एचएन रिलायन्स रुग्णालयात पूर्व नियोजित तपासणीसाठी दाखल झाले आहेत. तुमच्या शुभेच्छामुळं सर्व काही ठीक आहे, पुन्हा कार्यरत होण्यासाठी आणि तुमच्यासेवेसाठी पूर्णपणे तयार आहेत. असं ट्विट त्यांनी केले आहे.

2 दिवसांआधी उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कात दसरा मेळावाही घेतला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतही उद्धव ठाकरे हजर होते. मात्र पुढच्या काही तासांतच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करुन अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. ऐन निवडणुकीत अ‍ॅन्जिओप्लास्टी झाल्यानं उद्धव ठाकरे यांना आता प्रचारासाठीही काही प्रमाणात निर्बंध येतील.

अ‍ॅन्जिओप्लास्टी म्हणजे काय

आधी रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहेत की नाही हे तपासण्यासाठी अ‍ॅन्जिओग्राफी ही चाचणी केली जाते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज झाल्यास बायपास सर्जरी किंवा अ‍ॅन्जिओप्लास्टी केली जाते. अ‍ॅन्जिओप्लास्टी करताना मांडीतल्या रक्तवाहिनेतून एक पातळ ट्युब टाकून ब्लॉकेज पर्यंत नेली जाते. या ट्युबच्या टोकाला हवा भरता येईल असा बलून असतो, हा बलून फुगवून ब्लॉकेज दूर केले जातात.

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत. पुढच्या 2-3 दिवसांत प्रचाराला वेग येईल. मात्र, अ‍ॅन्जिओप्लास्टीमुळं उद्धव ठाकरे यांना पुढचे काही दिवस विश्रांती करावी लागेल.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. साधारण दसऱ्यानंतर आचार संहिता लागेल अशी शक्यता होती. निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा करणार आहे.